आ. संग्राम जगताप यांचे समर्थकांचा हिरमोड : शिवसेनेत मात्र समाधान
अहमदनगर (प्रतिनिधी) – मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज होण्याचे लोण आता नगरमध्येही पोहचले आहे. नगर शहर मतदारसंघातील आ. संग्राम जगताप यांना स्थान न मिळाल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. इतर ठिकाणी पदाधिकार्यांनी राजीनाम्याचे अस्त्र बाहेर काढले असले, तरी नगरमध्ये मात्र अद्याप तसे पाऊल कोणी उचलले नाही. दरम्यान, शिवसेनेत मात्र यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील अनेक दिग्गज नाराज आहेत. नगरचे आ. संग्राम जगताप यांची वर्णी हमखास लागणार, असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात होता. गेले काही दिवस लॉबिंग करण्याचेही जोरदार प्रयत्न झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आ. जगताप समर्थकांनी भेट घेऊन मागणी केल्याचेही सांगण्यात येते. काल सकाळपर्यंत आ. जगताप यांचे समर्थक मंत्रीपद मिळेलच, या आशेवर होते. मात्र अखेर पक्षाकडून यादी जाहीर झाल्यानंतर समर्थकांमध्ये कमालीची नाराजी पसरली.
लोकसभा निवडणुकीत पक्षाला उमेदवार मिळत नसल्याने आ. अरूण जगताप यांना उभे राहण्याचा आग्रह केला. मात्र आ. संग्राम जगताप यांनी पक्षाला नाराज करायला नको म्हणून स्वतः उमेदवारी केली. राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर सलग दोनवेळा ते निवडून आले आहेत.
पहिल्यांदा सलग पाचवेळा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्त्व करणारे शिवसेनेचे उपनेते आ. अनिल राठोड यांचा त्यांनी पराभव केला. पक्षाला यापूर्वी प्रयत्न करूनही नगरची जागा मिळत नव्हती. ती आ. जगताप यांनी खेचून आणल्याकडे समर्थक निर्देश करतात. यावेळीही पक्षाचा एकही वरिष्ठ नेता प्रचाराला न येताही दुसर्यांदा विजय मिळविला. विशेष म्हणजे शिवसेना-भाजपची युती असतानाही आ. जगताप यांनी विजयश्री खेचून आणली. असे असतानाही पक्षाने त्याची दखल न घेतल्याने नाराजी वाढली आहे.
महापालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीनंतर आ. जगताप यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन भाजपशी केलेली सलगी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांना रूचलेली नाही. ती नाराजी अद्याप त्यांच्या डोक्यातून गेली नसल्याचे एकीकडे सांगितले जात असले, तरी दुसरीकडे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आ. जगताप यांना उमेदवारी दिल्यामुळे ती नाराजी संपुष्टात आली होती, असेही दुसरीकडे सांगण्यात येते.
भाजपच्या 80 तासांच्या सरकारमध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी जे आमदार अजित पवार यांच्या जवळचे मानले जात होते, त्यात आ. जगताप यांचाही समावेश असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच आ. जगताप यांना मंत्रीमंडळात संधी मिळाली नसल्याची चर्चा आहे. आ. जगताप यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने शिवसेनेत मात्र समाधान असल्याचे एका नेत्याने खासगीत बोलताना सांगितले.
शिवसेनेची अडचण
केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडात आ. संग्राम जगताप यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. यासाठी शिवसेनेने प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात घेतल्यास वेगळा संदेश जाईल, असे शिवसेनेचे मत होते. आ. जगताप यांच्या मंत्रिमंडळातील सहभागात ही देखील अडचण असल्याचे बोलले जाते.
आम्हाला कुठे ‘मामा’ आहे ?
मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने दोन दिवसांपासून मुंबईत असलेले आ. जगताप यांचे समर्थक नगरमध्ये रिकाम्या हाताने परतले. आल्यानंतरच्या त्यांच्या प्रतिक्रिया गंभीर होत्या. ‘आम्हाला ‘मामा’ नसल्याने मंत्री होऊ शकलो नाहीत’ असे एकाने सांगितले. यास राज्यमंत्री झालेले प्राजक्त तनपुरे यांचा संबंध जोडला गेला. तसेच ‘आम्ही कारखानदार नाहीत, आमच्याकडे साखर कारखाना नाही’ अशीही पुस्ती काही समर्थकांनी जोडली.