Thursday, November 14, 2024
Homeनगरचिनी मांजाने चिरला मुलाचा गळा !

चिनी मांजाने चिरला मुलाचा गळा !

श्रीरामपुरातील घटना; मुलावर शस्त्रक्रिया; कारवाईबाबत पालिका प्रशासन उदासिन

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- शहरातील मोरगेवस्ती भागात चिनी मांज्यामुळे 12 वर्षांच्या मुलाचा गळा चिरल्याची घटना घडली. आर्यन विजय गुळवे असे जखमी मुलाचे नाव आहे. जखमीला प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून त्याच्यावर शस्त्रक्रिया करून सुमारे 10 ते 12 टाके टाकण्यात आले आहेत. चिनी मांजामुळे मोठ्या प्रमाणात मुलगा जखमी झाल्याने नागरिकांमधून चिनी मांजा विक्री करणार्‍याविरोधात संताप व्यक्त होत असताना प्रशासन मात्र कारवाईबाबत उदासीन दिसत आहे.

- Advertisement -

काल सकाळी मोरगेवस्ती कॅनॉल रोडने आर्यन गुळवे हा आपले वडील विजय गुळवे यांच्याबरोबर मोटारसायकलवरून चालला होता. ते संजीवनी हॉस्पिटल परिसरात आले असता अचानक चिनी मांजा त्यांच्या अंगावर पडला. मोटारसायकल चालवीत असलेले विजय गुळवे यांनी चिनी मांजा हुकविला. मात्र त्यांच्यामागे बसलेल्या आयर्न गुळवे याच्या गळ्यावर चिनी मांजा आल्याने त्याचा गळा चिरला.

गळा चिरल्यामुळे आर्यन पूर्णपणे रक्ताने माखलेला होता. काही केल्याने त्याचे रक्त थांबत नव्हते. त्यामुळे त्याला जवळच असलेल्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र रक्तश्राव थांबत नसल्याने त्याला तातडीने प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी येथे हलविण्यात आले. तिथेच त्याच्यावर रात्री उशिरा शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याला 10 ते 12 टाके टाकण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर आहे.

यापूर्वी या परिसरातील दोन घटना घडलेल्या आहेत. येथील बाळासाहेब मोरगे यांचाही गळा कापला होता. त्यांना 20 टाके पडलेले होते. त्यानंतर नाना टी चे संचालक नाना नागले यांच्या हाताची बोटे कापली होती. या घटना ताज्या असतानाच एका मुलाचा गळा चिरला आहे.
दरम्यान, मकर संक्रातीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सध्या पतंग उडविण्याची धूम सुरू आहे. चिनी मांजा पक्का असल्याने तो तुटत नाही. त्यामुळे मुले याचीच खरेदी करतात. मात्र या दोरामुळे यापूर्वी अनेकजण जखमी झाले आहेत.

तसेच पक्षांच्या पायात देखील हे दोरे गुंतून त्यांचा नाहक बळी गेला आहे. तर काही ठिकाणी वीज वाहक करणार्‍या तारांमध्येही पतंग तसेच दोर गुंतून शॉर्टसर्किट होण्याच्या घटना घडल्या आहेत. एकंदरितच चिनी मांजाचे दुष्परिणाम लक्षात घेऊन चिनी मांजा विक्री करणार्‍यांविरोधात तातडीने पालिका प्रशासनाने कारवाईची मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

पालकांनीही खबरदारी घेणे गरजेचे !
शहरात दिवसेंदिवस पतंग उडविण्याचे फॅड वाढत चालले आहे. अनेक तरुण गाण्याच्या तालासुरात विविध ठिकाणांहून पतंग उडविण्याच्या स्पर्धा आयोजित करतात. पालकही मुलाच्या हट्टापुढे हतबल होत चिनी मांजा खरेदीसाठी पैसे देऊ करतात. यातूनच चिनी मांजाची खरेदी केली जाते. मात्र यातून होणारे अपघात लक्षात घेऊन पालकांनीही आपल्या मुलांना चिनी मांजा खरेदी करण्यापासून रोखणे गरजेचे आहे.

कारवाईच्या सूचना देऊनही कारवाई होईना !
चिनी मांजा विक्रीवर बंदी असतानाही श्रीरामपूर शहरात राजरोसपणे चिनी मांजा विक्री सुरू आहे. पालिका प्रशासनाने यापूर्वी आवाहन करूनही शहरातील व्यावसायिक राजरोसपणे चिनी मांजाची विक्री करीत आहेत. गेल्या आठवड्यात अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनीही चिनी मांजावर कारवाई करण्याची सूचना केली होती. तरीही शहरात मोठी कारवाई झाली नाही. त्यामुळे या मांजामुळे अपघाताच्या घटना घडत असून अनेकजण जखमी झाले आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या