Thursday, November 14, 2024
Homeनगरसोनसाखळी चोर्‍या, घरफोड्या रोखण्यात शहर पोलीस कुचकामी

सोनसाखळी चोर्‍या, घरफोड्या रोखण्यात शहर पोलीस कुचकामी

नगरकर त्रस्त : नाकाबंदी, गस्त घालूनही काहीच परिणाम नाही

अहमदनगर (प्रतिनिधी)- अलीकडच्या काळात शहरासह उपनगरात वाढत्या घरफोड्या, सोनसाखळी चोरीच्या घटनात वाढ झाली आहे. यामुळे नगरकर असुरक्षित असून चोर्‍या, घरफोड्या रोखण्यात शहर पोलीस अपयशी ठरले आहेत. यामुळे चोर शिरजोर झाले आहेत. चोरीचा आलेख वाढत आहे. पोलीसांकडून नाकाबंदी केली जात असून गस्त वाढवली जात असल्याचे सांगितले जात असले तरी नाकाबंदी, गस्त कुचकामी ठरत आहे.

- Advertisement -

नगर शहरासाठी कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प पोलीस ठाणे आहे. तर शहराला जोडून असलेल्या एमआयडीसीसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे आहे. गेल्या एक ते दीड महिन्यांपासून शहरातील बालिकाश्रमरोड, सावेडी परिसर, एमआयडीसी परिसर, भिंगार परिसर, स्टेशनरोड आदी भागामध्ये घराफोड्याबरोबरच रस्त्याने पायी, दुचाकीने जाणार्‍या महिलांच्या गळ्यातील सोने चोरून, पर्स हिसकावून धूम ठोकणार्‍या धूमस्टाईलमध्ये वाढ झाली आहे. यामुळे महिला सुरक्षित राहिल्या नसून नगरची ओळख लुटमार नगर अशीच झाली आहे. दिवसाला चार-पाच चोर्‍या, घरफोड्या तर दोन-तीन सोनसाखळी चोरीच्या घटना घडत आहेत.

पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली जाते. पोलीस घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करतात. गुन्ह्याची नोंद केल्यानंतर प्रत्यक्षात तपास मात्र होत नाही. यामुळे चोरांचे धाडस वाढत चालले आहे. मागील आठवड्यात गावडे मळ्यातील एक कुटुंब घर बंद करून पुण्याला गेले. त्याच रात्री चोरट्यांनी त्यांचे बंद घर फोडून तब्बल 34 तोळे व रोख रक्कम लंपास केली. ही धाडसी घरफोडी करून चोरांनी पोलिसांसमोर नवीनवर्षांचे आव्हान निर्माण केले. पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली, डॉग पथक बोलवून माग काढला मात्र पुढे तपासात प्रगतीच झाली नाही. मागील काही दिवसांपासून सोनसाखली चोरीच्या अनेक घडत आहेत.

लग्नासाठी बँकेतून काढलेले 15 तोळे चोरट्यांनी लंपास केले तर, नगर-कल्याण रस्त्यावर पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना चोरट्याने महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावले यात महिलेचा तोल जाऊन दुचाकीवरून खाली पडून जखमी झाली. सोनसाखळी चोरीच्या एक ना अनेक घटना दररोज होत आहेत.

नगरच्या वाढत्या लोकसंख्येला पोलीस ठाणे व पोलीस बळ अपुरे पडत आहे. हे सत्य असले तरी आहे ते पोलीस बळाचे योग्य नियोजन केले तर चोरीच्या घटना रोखण्यात पोलिसांना यश येईल. काही वर्षांपूर्वी सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. यावेळी तत्कालीन पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी प्रभावी अमंलबजावणी करून सोनसाखळीच्या घटनांना आळा घातला होता. मात्र, सध्या चारही पोलीस ठाण्याचे प्रभारी कुचकामी ठरत आहेत. शहर पोलीस उपाधीक्षकांची भूमिका मवाळ ठरत आहे. शहर पोलिसांकडून चोर्‍या रोखण्यासाठी नाकाबंदी केली जात आहे. तर, रात्रीची गस्त केली जाते. परंतु, चोरीच्या संख्येत वाढतच होत असल्याने या नाकाबंदी व गस्तीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

चोरट्यांचे धाडस वाढले
शहरात सोनसाखळी चोर, घरफोड्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या चोर्‍या, घरफोड्या रोखण्यासाठी शहर पोलिसांकडून नाकाबंदी, रात्रीची गस्त यामध्ये वाढ करण्यात आली आहे. परंतु, नाकाबंदी, गस्त वाढवून देखील गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढच होत आहे. पोलीस प्रशासनाचा वचक व गुन्हेगारी रोखण्यासाठी नियोजन नसल्याचा फायदा चोर घेत आहेत. चोर शिरजोर झाले असून चोरांचे धाडस वाढतच आहे. ठोस उपाययोजना करून सोनसाखळी चोरीच्या घटनांबरोबरच घरफोड्या रोखण्याची अपेक्षा शहर पोलिसांकडून आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या