कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील उक्कडगाव येथे बापलेकाने महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला. त्यानंतर काही तासांतच चुलत भावानेच अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करून तिचा विनयभंग केला. या दोन्ही घटनांप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या घटनेत फिर्यादी महिला रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घरात दूरचित्रवाणी संचावर कार्यक्रम पाहत असताना आरोपी विठ्ठल निकम व त्याचा मुलगा गणेश निकम हे आले. विठ्ठल निकम फिर्यादी महिलेस म्हणाला, तू माझ्या मुलाला काय सांगितले? असे म्हणून फिर्यादी महिलेला मिठी मारून विनयभंग केला. त्यावेळी महिला आरोपीच्या मुलाला म्हणाली की, तुझ्या बापाला समजावून सांग त्यावेळी गणेश निकम याला राग येऊन त्यानेही अश्लिल शेरेबाजी केली. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी गुरनं 1/2020 भादंवि कलम 452, 354, 34, 109, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसर्या घटनेत माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणार्या अल्पवयीन मुलीची शाळा दुपारी जेवणासाठी सुटली असता आरोपीने त्याचा लहान भाच्याला घेण्याच्या बहाण्याने तिला घरात बोलावले व तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. टाचणीच्या साहाय्याने त्याच्या ताब्यातून मुलीने कशीबशी सुटका करून घेतली. ती निघून जात असताना, तू यातील कोणाला काही सांगितले तर मी घरात काहीही करून घेईन, अशी धमकी दिली.
तिने झालेला अतिप्रसंग आईला सांगितला. त्यानंतर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आरोपी योगेश बागुल याच्याविरुद्ध गुरनं 3/2020 भादंवि कलम 354, 506 सह बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण कायदा 2012 चे कलम 8 प्रमाणे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे हे करीत आहेत.