Wednesday, November 20, 2024
Homeनगरजिल्ह्यात सहा लाख हेक्टवर रब्बीची पेरणी

जिल्ह्यात सहा लाख हेक्टवर रब्बीची पेरणी

गव्हाच्या क्षेत्रात वाढ : उसाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता

अहमदनगर (प्रतिनिधी) – रब्बी हंगामात आतापर्यंत 91 टक्के म्हणजेच सहा लाख पाच हजार 137 हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. रब्बी ज्वारीची 55 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. इतर रब्बी कडधान्याची 128 टक्के पेरणी झाली आहे. रब्बी हंगामात सहा लाख 67 हजार 261 हेक्टरवर पेरणीचे उद्दिष्ठ होते. त्यापैकी सहा लाख पाच हजार 137 हेक्टर क्षेत्रावर रब्बीचे पीक डोलत आहे. गव्हाची पेरणीही अपेक्षेपेक्षा जास्त झाली असून, रब्बी कडधान्यही मोठ्या प्रमाणावर पेरण्यात आले आहे.

- Advertisement -

159 हेक्टर प्रस्तावित क्षेत्र असलेल्या तिळाची पेरणी मात्र झालीच नसल्याचे कृषी विभागाच्या अहवालावरून दिसत आहे. यंदा पेरण्यास विलंब झाला असल्याने रब्बी हंगाम देखील अपेक्षेप्रमाणे लांबणार आहे. जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यांच्या सुरुवातीच्या काही दिवसांपर्यंत पाऊस पडत होता. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या सोंगणीसह रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या होत्या.

जिल्ह्यात एकूण सहा लाख 67 हजार 261 हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी सहा लाख पाच हजार 137 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. त्यात तीन लाख 34 हजार 989 हेक्टरवर रब्बी तृणधान्य पेरले आहे. 91 हेक्टरवर रब्बी गळीतधान्य पेरले आहे. जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठे आहे. यंदा जिल्ह्यात पाऊस चांगला झाला असल्याने ऊस प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.

त्याप्रमाणे उसाच्या क्षेत्रात मात्र वाढ झालेली नाही. उसाच्या एक लाख 21 हजार 180 हेक्टर प्रस्तावित क्षेत्रापैकी अवघ्या 26 हजार 64 हेक्टरवर ऊस लागवड करण्यात आली आहे. 40 हजार हेक्टरवर चारा पिकांचे उत्पादन होणार आहे. जिल्ह्यात गव्हाचे 49 हजार 785 हेक्टर प्रस्तावित क्षेत्र आहे. त्यापेक्षा जास्त म्हणजे 62 हजार तीन हेक्टरवर गहू पेरणी झाली आहे.

आता शेतीच्या कामाला वेग आला आहे. लष्करी अळीचा खरीप हंगामात प्रादुर्भाव झाला होता. तरीदेखील जिल्ह्यात रब्बी हंगामात 13 हजार 591 हेक्टवर मका पेरणी झालेली आहे. हरभरा 71 हजार 453 हेक्टवर पेरणी झाली आहे. कांदा पिकाच्या लागवडीचे क्षेत्र एक लाख सहा हजार 870 हेक्टरपर्यंत पोहोचले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या