Thursday, March 13, 2025
Homeअग्रलेखसंपादकीय : २० नोव्हेंबर २०२४ - मधुमेह वाढतोय

संपादकीय : २० नोव्हेंबर २०२४ – मधुमेह वाढतोय

भारत मधुमेहाची राजधानी बनत आहे यावर जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालाने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. जगात सुमारे 89 कोटी लोक मधुमेहग्रस्त आहेत. त्यापैकी सुमारे एक चतुर्थांश लोक एकट्या भारतात आहेत, असे अहवालात नमूद असल्याचे वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि एक सामाजिक संस्था यांनी हा अहवाल तयार केला आहे.

मधुमेह होण्याचे वयदेखील कमी झाल्याचे आढळते. युवावस्थेत ही व्याधी जडते. राज्य शासनाने गतवर्षी राज्य पातळीवर महिलांची आरोग्य तपासणी केली. महिलांमध्ये वाढता मधुमेह हा त्यातील एक निष्कर्ष होता. मधुमेहाचे अनेक प्रकार सांगितले जातात. प्रकार एक, प्रकार दोन हे दोन सामान्यतः लोकांना माहीत असतात. अनेक बालकांना जन्मतः मधुमेह आढळतो. अनेक कुटुंबांमध्ये आधीच्या पिढीत तो आढळतो. मधुमेह हा माणसांच्या जीवनशैलीचा एक भाग बनत चालला असावा इतके त्याचे प्रमाण वाढत आहे.

- Advertisement -

मधुमेह झाला असे निदान होताच माणसे ताणात येतात. अस्वस्थ होतात. तथापि त्याचा स्वीकार करणे ही मधुमेहाला नियंत्रणात ठेवण्याची पहिली पायरी ठरू शकेल. बैठी जीवनशैली समाजाने स्वीकारली आहे. भोवताली स्पर्धेचे वातावरण आहे. पुढे जाण्याची चढाओढ आहे. चिंता करण्याची सवय माणसांना जडत आहे. परिणामी ताणतणाव हा दैनंदिनीचा भाग बनत आहे. तथापि अशी परिस्थिती मधुमेह बळावण्याला पूरक ठरते. मधुमेह बळावला तर त्याचे शरीरांतर्गत अवयवांवर विपरीत परिणाम होतात. त्याला अवयवांचा मूक मारेकरी संबोधले जाते. तो आरोग्याचे प्रश्न गंभीर बनवतो.

तेव्हा तो नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. माहिती मिळवणे ही त्याची पहिली पायरी ठरू शकेल. कोणत्या प्रकारचा मधुमेह झाला आहे, तो नियंत्रणात कसा ठेवता येईल, त्यासाठी योग्य आहाराचे महत्त्व, त्याच्या वेळा निश्चित करणे, तज्ज्ञांनी सांगितलेली पथ्ये पाळणे, वेळोवेळी त्यांनी सांगितलेल्या तपासण्या करून घेणे, दररोज व्यायाम करणे, स्थूलता आटोक्यात ठेवणे अशा गोष्टी अंगिकारणे आवश्यक ठरते. शांत आणि पुरेशी झोप हा अत्यंत दुर्लक्षित मुद्दा आहे. तथापि मधुमेहच नव्हे तर कोणत्याही व्याधींसाठी शांत झोप हादेखील पूरक उपाय मानला जातो.

ती मिळवण्यासाठी ताण, चिंता यांचे नियमन करणे गरजेचे ठरते. मधुमेह प्रयत्नांती नियंत्रणात ठेवला जाऊ शकेल. नव्हे, तसे करणार्‍या अनेक व्यक्ती अवतीभोवती आढळतात. तेव्हा मधुमेह समजून घेऊन त्यावर काम करणे यातच शहाणपण आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...