नवी दिल्ली । वृत्तसंस्था
भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत हे देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बनले आहेत. आज त्यांची नियुक्ती करण्यात आली.
रावत यांच्या कार्यकाळात आणखी तीन वर्षांनी वाढ केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षांवरून 65 वर्षे करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात तीनही सैन्यदलामध्ये समन्वय साधण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदाची निर्मिती करण्याबाबतची घोषणा केली होती. त्यानंतर कोण होणार पाहिले अधिकारी यावर तर्क वितर्क लढवले जात होते.
मात्र, आज रावत यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. रावत आता तिन्ही सैन्यदलांशी संबंधित प्रकरणांविषयी संरक्षणमंत्र्यांना सल्ला देण्याची महत्त्वाची जबाबदारी स्वीकारतील.
सीडीएस संरक्षणमंत्र्यांचे प्रधान सैन्य सल्लागार असतील. तथापि, सैन्य सेवांशी संबंधित विशेष प्रकरणांमध्ये तिन्ही सेवाप्रमुख पूर्वीप्रमाणेच संरक्षणमंत्र्यांना सल्ला देत राहतील.
लष्करी मोहिमेदरम्यान सीडीएस तिन्ही सैन्यदलांत समन्वय साधण्याचे काम करतील. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदावर 4 स्टार जनरल रँकच्या लष्करी अधिकाऱ्याला नियुक्त करण्यात आले. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांना तीन सैन्यदलांच्या प्रमुखांइतके वेतन देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.