Sunday, May 5, 2024
Homeनगरमहिला पोलिसावर कोठडीतील गुन्हेगाराचा चाकूहल्ला

महिला पोलिसावर कोठडीतील गुन्हेगाराचा चाकूहल्ला

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातील जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या स्वयंपाक घरातील चाकू चोरून घेऊन न्यायालयीन कोठडीत असलेल्या बंदीस्त आरोपीने बंदोबस्तावरील महिला पोलीस कर्मचार्‍यावर पळून जाण्याच्या उद्देशाने चाकूहल्ला केला. जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रविवारी (दि. 22) पहाटे साडेपाच वाजता ही घटना घडली. पावलस कचरू गायकवाड या बंदीस्त आरोपीने हा हल्ला केला. या हल्ल्यात महिला पोलीस कर्मचारी सुजाता निवृत्ती शेळके-हाडवळे (वय- 27, नेमणूक जिल्हा मध्यवर्ती कारागृह) या जखमी झाल्या आहेत.

पावलस गायकवाड हा पारनेर येथील कलम 307 या गुन्ह्यातील आरोपी आहे. जखमी महिला पोलीस कर्मचारी सुजाता शेळके यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुजाता शेळके या कारागृहातील मुख्य प्रवेशद्वारावर त्यांच्या सहकार्‍यांसोबत पहाटे साडेपाच वाजता बंदोबस्ताला होत्या. न्यायाधीन बंदी आरोपी पावलस कचरू गायकवाड याने स्वयंपाक गृहातील चाकू घेतला. कारागृहातून पळून जाण्याच्या उद्देशाने शेळके यांचे डोक्याचे केस धरून पावलस याने त्यांच्या गळ्यावर चाकूने वार केला.

- Advertisement -

तो वार महिला पोलीस कर्मचारी सुजाता यांनी त्यांचे डाव्या हातावर झेलला. पावलस याचा वार एवढा जोरात होता की सुजाता या त्यात गंभीर जखमी झाल्या. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सुजाता आणि पावलस यांच्यात चांगलीच झटापट झाली. आरडाओरडा देखील झाला. आरोपी पावलसच्या हल्ल्यामुळे कारागृहात एकच गोंधळ उडाला. बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांनी कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे धाव घेतली आणि पावलस याला शिताफीने ताब्यात घेतले. जखमी महिला पोलीस कर्मचारी सुजाता यांच्या फिर्यादीवरून पावलस याच्याविरोधात कर्तव्यामध्ये अडथळा निर्माण करून कारागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या