Tuesday, May 7, 2024
Homeनगरकर्जत : राजकारण तापले अन् अखेर कुकडीचे आवर्तन सुटले

कर्जत : राजकारण तापले अन् अखेर कुकडीचे आवर्तन सुटले

आवर्तन ठरलेल्या तारखेनुसार सोडण्यात आले ः आ. रोहित पवार

कर्जत (तालुका प्रतिनिधी)- कुकडी डावा कालव्याचे आवर्तन 6 जून रोजी सुटणार असे आमदार रोहित पवार यांनी जाहीर केले होते आणि त्याच दिवशी सायंकाळी येडगाव धरणातून 500 क्यूसेक क्षमतेने आवर्तन सोडण्यात आले आहे. यामुळे माजी मंत्री राम शिंदे यांनी आ. रोहित पवार यांच्यावर केलेला आरोप खोटा ठरला आहे.
कुकडी कालव्याची उन्हाळी आवर्तन नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्यांसाठी सोडण्यात आले आहे.

- Advertisement -

यामध्ये मिळालेली माहिती अशी की, कुकडीचे हे आवर्तन कमी पाण्याचे असून यामध्ये शेती ऐवजी बाजार तलाव पिण्याच्या पाण्यासाठी भरून देण्यात येणार आहेत. यामध्ये श्रीगोंदा तालुक्यासाठी पाच दिवस, कर्जत सात व करमाळा सहा दिवस असे आवर्तन देण्यात येणार आहे.

कुकडी कालव्याचे आवर्तन सहा जून रोजी सुटणार, असे आमदार रोहित पवार यांनी जाहीर केले होते. यानंतर माजी मंत्री राम शिंदे यांनी एक जून रोजी कर्जत तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते. या आंदोलनाच्या वेळी त्यांनी कुकडीचे आवर्तन सहा जून रोजी सुटणार नाही, असे सांगून आमदार रोहित पवार यांनी शेतकर्‍यांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. परंतु आमदार रोहित पवार यांनी स्वतःचा शब्द खरा करून दाखवत आवर्तन त्याच दिवशी सोडून जनतेला दिलेला शब्द हा शब्दच असेल आणि तो पूर्ण करेल हा त्यांचा ठाम विश्वास त्यांनी पुन्हा एकदा तालुक्यातील शेतकर्‍यांना दाखवून दिला आहे.

कुकडीचे आवर्तन आवरून अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. यापूर्वी देखील कुकडी पाण्याच्या प्रश्नावरून अशाच पद्धतीने राजकीय नेत्यांनी राजकारण केले आहे. मात्र या राजकारणाच्या मोहापायी शेतकर्‍यांचा मात्र नेहमी बळी जातो. यामुळे किमान पाण्याच्या प्रश्नावर तरी राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन तालुक्यातील जनतेचे हक्काचे पाणी देण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे.

कुकडी आवर्तनाकडे शेतकर्‍यांचे लक्ष
कुकडीचे आवर्तन केव्हा सुटणार याकडे पारनेर, श्रीगोंदा, कर्जत व करमाळा या तालुक्यातील शेतकर्‍यांचे डोळे लागले होते. पावसाळा उंबरठ्यावर आला असला तरी देखील विहिरी, पाझर तलाव कोरडे पडले आहेत. पिकांना पाण्याची गरज आहे. पाण्याअभावी पिके जळू लागली. कुकडीचे आवर्तन सुटले तर शेतकर्‍यांचे हातचे पीक वाचणार आहे. यामुळे शेतकरी आवर्तन तात्काळ सुटावे यासाठी देव पाण्यात घालून बसले होते. अखेर त्यांना दिलासा मिळाला व धरणातील पाणी कालव्यामध्ये झेपावून शेतकर्‍यांच्या शेताकडे निघाले.

कुकडीचे आवर्तन ठरलेल्या तारखेनुसार सोडण्यात आले आहे. मला कुकडीच्या पाण्यावरून कोणतेही राजकारण करावयाचे नाही. कुकडी लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना मग ते कोणत्याही तालुक्यातील असो, त्यांना त्यांच्या हक्काचे पाणी नियमितपणे व नियोजनानुसार कसे मिळेल, यावरच माझा भर आहे व राहील, असे आमदार रोहित पवार म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या