Monday, November 18, 2024
Homeनगरमहाविकास आघाडीची आज रात्री संयुक्त बैठक

महाविकास आघाडीची आज रात्री संयुक्त बैठक

जिल्हा परिषदेच्या सत्ता समिकरणावर होणार अंतिम निर्णय

अहमदनगर (प्रतिनिधी)– जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीसह सत्ता समीकरणावर अंतिम निर्णय घेण्यासाठी आज सोमवारी रात्री महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि गडाख गटाची बैठक होणार आहे. या बैठकीत उपाध्यक्ष पदासह अन्य चार विषय समित्यांबाबत निर्णय होणार आहे. जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष असणार्‍या राष्ट्रवादीच्या वाट्याला अध्यक्षपद येणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झालेले आहे.

- Advertisement -

जिल्हा परिषदेत भाजप आणि विखे यांना रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र आली आहे. या आघाडीने त्यांचे सदस्य बळ हे 50 पर्यंत पोहचले असल्याचा दावा केला आहे. यामुळे जिल्हा परिषदेत सर्वात अधिक सदस्य असणार्‍या राष्ट्रवादीच्या वाट्याला अध्यक्ष मिळणार असल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला.

दरम्यान, शनिवारी भाजपचे आ. राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी 31 तारखेला होणार्‍या अध्यक्ष पदाच्या निवडीत भाजप सहभागी होऊन विजय खेचून आणणार असल्याचा दावा केला आहे. भाजपचा उमेदवार निवडीच्या दिवशी समोर येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे जिल्हा परिषदेतील सत्ता संघर्ष शिगेला पोहचल्याचे चित्र आहे.

त्यातच आता महाविकास आघाडीतील काँग्रेस, सेना आणि गडाख गट मलईदार सभापती पदासाठी आक्रमक झाला असून या सर्वांचा केंद्रबिंदू अर्थ आणि बांधकाम समिती झाली आहे. यामुळे आज होणार्‍या बैठकीत या समितीबाबत काय निर्णय होणार यावर पुढील राजकीय समिकरणे अवलंबून राहणार आहेत.

लवासातील आघाडीचे सदस्य हलविले
काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सदस्यांना खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी आणि रविवारी पुण्याजवळील लवासा या निसर्गरम्य ठिकाणी ठेवण्यात आले होते. मात्र, रविवारी सायंकाळी त्यांना पुण्यात हलविण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. या सदस्यांना आता अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या दिवशी नगरमध्ये आणण्यात येणार आहे.

सदस्यांचे फोन बंद
शनिवारी सहलीला जाण्यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मोबाईल सुरू होते. मात्र, रविवारी हे मोबाईल बंद झाले होते. यामुळे सदस्यांशी संपर्क झाला नाही. यामुळे जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीच्यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून पुरेपूर काळजी घेण्यात येत असल्याचे दिसून आले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या