Thursday, May 16, 2024
Homeनाशिकवाढती थंडी रब्बीला पोषक, द्राक्षाला घातक; अवकाळी पावसाचा जाणवतोय परिणाम

वाढती थंडी रब्बीला पोषक, द्राक्षाला घातक; अवकाळी पावसाचा जाणवतोय परिणाम

नाशिक तालुका वार्तापत्र | सुधाकर गोडसे

अवकाळी पावसाने थैमान घातल्याने रब्बी हंगामाला उशीर झाला असला तरी थंडीमुळे रब्बी पिकांना पोषक वातावरण आहे. मात्र वाढती थंडी द्राक्षासाठी घातक ठरू पहात आहे. नाशिक तालुक्याच्या पुर्व व पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष पिक घेतले जाते. ऑक्टोबर छाटणीनंतर झालेल्या पावसाने या पिकाचे 40 टक्के नुकसान झाले. उर्वरित पिक वाचवण्यासाठी बळीराजाने औषधांचे डोस दिले. वाचलेल्या बागा चांगली आर्थिक कमाई होणार अशी आशा बाळगणार्‍या द्राक्ष बागायतदारांना वाढत्या थंडीचा पुन्हा फटका बसू पहात आहे. तयार होणार्‍या मालाची फुगवण होत नसल्याने बळीराजा चिंतेत पडला आहे.

- Advertisement -

मधूनच ढगाळ वातावरण निर्माण झाल्यास झाडाची अन्न तयार करण्याची प्रक्रिया थांबते. त्याचा थेट परिणाम दर्जावर होत आहे. अशा थंडीच्या वातावरणात द्राक्ष बागांना सुर्यप्रकाशाची नितांत गरज असताना नेमके तेच होत नाही. त्यामुळे वाचलेल्या बागांवर केलेला खर्च चांगला भाव न मिळाल्यास वाया जाईल, अशी भीती आताच व्यक्त होत आहे. मात्र रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांना पडणारी थंडी लाभदायक ठरत असून सध्या तालुक्यात या पिकांची वाढ जोरदार होत असल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे.

पाण्याची मुबलकता असल्याने दारणाकाठच्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिक घेतले जाते. कोबी, फ्लॉवर, मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू या नगदी पिकांसाठी मोठे क्षेत्र आरक्षित झाल्याने व बाजारपेठेत त्याची आवक वाढल्याने दर कमालीचे कोसळले. शेतकर्‍यांसाठी सध्या भाजीपाल्याची अवस्था हलाखीची झाली असून मिळणारे दर लक्षात घेता अनेक शेतकर्‍यांनी मेथीच्या शेतात जनावरांना चरावयास सोडले आहे. त्यातच ढगाळ वातावरण असल्यास कोबी, फ्लॉवरचे उत्पादन वाढते व दर कोसळल्याने मिळेल त्या भावात त्याची विक्री करावी लागते. नोव्हेंबरमध्ये टोमॅटोला मिळालेला दर सर्वोच्च असताना बळीराजा खुशीत होता. मात्र डिसेंबरच्या दुसर्‍या आठवड्यापासून आवक वाढल्याने दर कोसळले व या पिकालासुद्धा मेथीचा भाव मिळाला.

यंदा पावसाळा लांबल्याने शेतीचे बजेट बिघडले. द्राक्ष बागायतदारांनी नियोजित केलेला कालावधी व करावयाची कामे हे संपूर्णपणे कोसळले. ऑक्टोबरमध्ये करावयाच्या छाटण्या नोव्हेंबरमध्ये झाल्या. डिसेंबर व जानेवारीमधील थंडीमुळे नवीन घडांना तडे जाण्याचे प्रकार वाढले. त्यात वातावरणातील बदलामुळे औषध फवारणीचा खर्च वाढल्याने उत्पादन खर्चापेक्षा मिळणारा दर कमी राहिल्यास कर्जाचा डोंगर पुन्हा उभा राहणार, हे निश्चित.
-श्रीनाथ थेटे, दुगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या