कृषि मंत्री दादाजी भुसे : शेतकर्यांशी साधला ऑनलाइन संवाद
अहमदनगर (प्रतिनिधी)- कृषि मालाचे ब्रॅण्डिंग करुन तो शहरातील ग्राहकांना उपलब्ध करुन दिल्यास शेतकरी बाधवांचा आर्थिक स्तर उंचविण्यात मदत होईल. राज्य शासन बाळासाहेब ठाकरे स्मार्ट शेतकरी योजना आणत आहे, या योजनेद्वारे शेतकर्यांना सक्षम बनविणार आहोत. गटशेती तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून सेंंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणार आहोत, असे प्रतिपादन राज्याचे कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी केले.
राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठात जागतिक बँक अर्थसहाय्यीत, राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान तंत्रज्ञान केंद्राद्वारे सेंद्रिय शेती निविष्ठा वापर, उत्पादन, प्रमाणीकरण आणि विपणन व्यवस्था या विषयावर एक आठवड्याचे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्याचा समारोप भुसे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी त्यांनी राज्यातील शेतकर्यांशी ऑनलाईन संवाद साधला.
अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा उपस्थित होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे माजी उपमहासंचालक डॉ. किरण कोकाटे, कुलसचिव डॉ. दिलीप पवार, नियंत्रक श्री. विजय कोते, प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. सुनिल गोरंटीवार, सह प्रमुख संशोधक डॉ. मुकुंद शिंदे आणि आयोजन सचिव डॉ. उल्हास सुर्वे उपस्थित होते.
भुसे म्हणाले, राज्यामध्ये 1585 शेतकरी गट असून त्यामध्ये सुमारे 65000 शेतकरी जोडले गेले आहेत. सध्या राज्यात 35000 हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती केली जात आहे. या गटांच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देवून बळकटीकरण केले जाईल. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर महात्मा फुले कृषि विद्यापीठाने शेतकर्यांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करुन ज्ञानदानाचे काम केले याबद्दल त्यांनी विद्यापीठाचे कौतुक केले.
कुलगुरु डॉ. विश्वनाथा म्हणाले कोनाच्या लॉकडाऊन कालावधीमध्ये कृषि विद्यापीठाने 22 ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम शेतकरी, विद्यार्थी आणि शास्त्रज्ञांसाठी आयोजीत केले असून अशा प्रकारचा उपक्रम देशामध्ये प्रथमच होत आहे. याप्रसंगी प्रगतशील शेतकरी व तजज्ञ कृषिरत्न विश्वासराव पाटील, अनिल देशमुख, प्रशांत नाईकवाडी, वैभव चव्हाण, रेवती जाधव, मोनिका मोहिते, विवेक माने, उत्तम धिवरे यांनी मनोगत व्यक्त केले.