Saturday, May 4, 2024
Homeनगरराज्य घटना वाचविण्यासाठी भाजपला सत्तेपासून दूर ठेवा

राज्य घटना वाचविण्यासाठी भाजपला सत्तेपासून दूर ठेवा

महसूलमंत्री थोरात : राम मंदिराला निधी दिल्याने गैर काय ?

अहमदनगर (प्रतिनिधी) – देशात समाजासमाजात भेद निर्माण करून राजकीय पोळी भाजून घेत सत्तेवर राहण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. राज्य घटना, आपल्या मतांचा अधिकार वाचविण्यासाठी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची गरज आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, सर्वांनी ताकद दिल्यास काँग्रेस पक्ष वाढणार असून यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आदेश महसूल मंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना दिले.

- Advertisement -

तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणार्‍या शिवसेनेने राम मंदिरासाठी एक कोटींचा निधी दिल्याने त्यात गैरकाय अशी भूमिका स्पष्ट केली. नगरमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात बोलत होते. यावेळी आ. सुधीर तांबे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सांळुके, जिल्हा बँकेचे संचालक संपत म्हस्के, विनायक देशमुख, दीप चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, एस.एम. कातोरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्याने उपस्थित होते.

महसूलमंत्री म्हणाले, दिल्लीत दंगली घडून माणसे मरत असतांना भाजप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतात दंग होते. हे लोकशाही दुर्दैवी असून आपल्या पक्षाची हवा येईल, आपण देखील सत्तेत येवू यासाठी गावागावात पक्षाचे संघटन तयार करा.

यासाठी प्रत्येकाला फिरावे लागेल. ज्या ठिकाणी काँग्रेसचा आमदार नाही, त्या मतदारसंघात देखील काँग्रेस पक्षाचे जुने कार्यकर्ते असून त्यांना सोबत नव्याने पक्षाची मोट बांधा, पक्षाने नवा कार्यक्रम तयार केला असून श्रीमती सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या मान्यतेनंतर त्यावर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच शिवसेनेने अयोध्येतील राम मंदिरासाठी एक कोटींची देणगी दिली, ठिक आहे. त्यातून काही प्रश्न निर्माण होत नाही. राम तर सर्वांचाच आहे, असे सांगत ना. थोरात यांनी या विषयावर आपली भूमिका विषद केली.

मुस्लिम समाजाला आम्ही आरक्षण या आधीही दिले होते. परंतु नंतरच्या भाजप सरकारने मुस्लिम आरक्षणाचा विषय पुढे नेला नाही. त्यामुळे आता आमच्या महाविकास आघाडी सरकारद्वारे मुस्लिम आरक्षणाचा विषय पुढे नेणार आहोत. ती आमची कमिटमेंट आहे व ती आम्ही पूर्ण करणार आहोत, आघाडीच्या समन्वय समितीची बैठक होणार आहे. त्यात हा विषय मांडण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केले.

राज्यसभेच्या 4 जागांवरून महाविकास आघाडी सरकारमध्ये नाराजी असल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला. आम्ही सर्व घटक पक्ष यावर निर्णय घेणार आहोत. काँग्रेसमध्ये यावरून काहीही नाराजी नाही. राष्ट्रवादी यात मनमानी करते, असेही काही नाही, हे त्यांनी आवर्जून सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या