Thursday, November 14, 2024
Homeनगरगड उभारण्यासाठी शहाणपण लागते

गड उभारण्यासाठी शहाणपण लागते

नामदेव शास्त्री यांचा माजी मंत्री पंकजा मुंडे यांना टोला

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) – कोणत्याही गोष्टीची नक्कल होत नसते. संत भगवानबाबांसारखे संत पुन्हा होणार नाहीत. भगवान गडासारखा दुसरा गड होणे शक्य नाही. गड कोणी कोठे उभारावा यासाठी शहाणपण लागते. प्रत्येक भाविकाच्या हृदयात भगवानगड आहे, अशा शब्दात भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेवशास्त्री यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांना चिमटे काढले.

- Advertisement -

पंकजा मुंडे यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाला गोपीनाथ गड असे नाव दिले. तेथे स्वतंत्रपणे कार्यक्रम सुरू करून महंतांच्या भाषणबंदीच्या फतव्यानंतर भगवानगडावर येणे बंद करून सावरगाव येथे दसरा मेळावा सुरू करून भगवान गडावरील दसरा मेळावा दुय्यम केला. यावरून निर्माण झालेली खदखद महंतांनी नाव न घेता बोलून दाखवली. श्रीक्षेत्र भगवानगड येथे संत भगवान बाबा 55 व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

समाधी पूजन, दिंडी प्रदक्षिणा, गादी पूजन, गड प्रदक्षिणा आदी कार्यक्रमानंतर महंत शास्त्री यांचे किर्तन झाले. शास्त्री म्हणाले, जगात चांगले काय चालले ते समजण्यासाठी भाग्य लागते.चांगल्याच्या मागे धावता-धावता कधीकधी बुद्धिमान माणसे सुद्धा स्वतःचे वाटोळे करून घेतात. देवापेक्षा संतांना श्रेष्ठ समजले जात असले तरी जवळची मंडळी संतांना त्रास देतात. अशा अपमानाचा बदला भाविक घेतात. ग्रंथराज ज्ञानेश्वरी महाराष्ट्राची जननी आहे.

ज्ञानेश्वरअगोदर बहुजन समाजात संत झाला नाही. बोलण्यातून समाज घडविण्यापेक्षा कृतीतून समाज घडवला जावा. गेल्या पाच वर्षापासून गडासाठी वर्गणी बंद झाली असली तरी ज्या गडाचे कामकाज सुरळीत सुरु आहे त्याचे नाव भगवानगड आहे. येत्या काळात गडावर संत ज्ञानेश्वरांचे भव्य मंदिर बांधले जाणार असून त्यानंतर भगवान बाबांच्या समाधी मंदिराचे काम हाती घेतले जाईल, असेही शास्त्री यांनी सांगितले.

भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या पुढाकाराने औरंगाबाद ते भगवानगड पायी दिंडी मधून हजारो भाविक गडावर दाखल झाले. बाबांच्या प्रतिमेची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. सकाळपासूनच समाधी दर्शनासाठी दर्शन रांगा सुरु होत्या. ऊस तोडणीसाठी गेलेले तोडणी कामगारही समाधी दर्शनासाठी आवर्जून आले. या वर्षीपासून विविध गावाहून पायी दिंड्या येण्याचे प्रमाण वाढले. भाविकांना महाप्रसादाचे वाटप ट्रॅक्टर ट्रॉलीतून करण्यात आले.

गडाला अच्छे दिन
दोन दिवसापूर्वी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी भेट दिली. त्यामुळे भगवान गडावर पुन्हा राजकीय भाषणे सुरू होणार अशी चर्चा परिसरात सुरू झाली. अशा चर्चा, अफवांचे महाराजांनी खंडन केले. राजकारण मुक्त झाल्याने गडावर शांतता आहे. यापुढे गडावर फक्त कीर्तनाचा आवाज होईल. कुठलेही राजकारण होणार नाही. देशात माहित नाही पण अशा निर्णयामुळे भगवानगडाला अच्छे दिन आले असल्याचा टोमणा त्यांनी मारला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या