नाशिक । पेटीएम कंपनीचा अधिकारी असल्याची बतावणी करीत भामट्यांनी केवायसी अपडेटच्या नावाखाली वृध्दाच्या पेटीएमला संलग्न असलेल्या आरबीएल बँकेच्या खात्यातून परस्पर 48 हजार 869 रुपये काढून घेतल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी विजय महादेव मिरजकर (76 रा.गणेश सोसा.शिखरेवाडी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मिरजकर यांच्याशी रविवारी (दि.5) भामट्यांनी संपर्क साधला होता. बीडब्ल्यू पीवायएम केवायसी सेंटर आयडी वरून संपर्क साधत भामट्याने पेटीएम कंपनीचा अधिकारी असल्याची बतावणी करीत केवायसी अपडेट करण्याचा बहाणा करून वृद्धाच्या पत्नीच्या मोबाईलवर एक लिंक पाठविली.
ही लिंक वृद्ध दांम्पत्याने अपडेट करताच वृद्धाच्या पेटीएमला संलग्न असलेल्या आरबीएल बँक खात्यातून चार ट्रान्झेक्शन करण्यात येऊन 48 हजार 869 रुपयांची रोकड परस्पर काढण्यात आली. याप्रकरणी वृद्ध दांम्पत्याने सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक बोरसे करीत आहेत.