Monday, November 18, 2024
Homeनाशिकथर्टीफस्ट साजरी करणाऱ्यांनो जरा जपून; तुमच्यावर दोन हजार पोलिसांची नजर

थर्टीफस्ट साजरी करणाऱ्यांनो जरा जपून; तुमच्यावर दोन हजार पोलिसांची नजर

नाशिक । प्रतिनिधी
थर्टीफस्टचे वेध सर्व नागरिकांना लागले आहेत, तर नववर्ष स्वागतास गालबोट लागू नये, यासाठी शहर पोलिसांनी चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. शहरात दोन हजार पोलीस अधिकारी व सेवक तैनात करण्यात आले असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.

नववर्ष स्वागतासाठी शहर सज्ज झाले असून विविध ठिकाणी साग्रसंगीत पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मद्याच्या नशेत काही घटना घडू नयेत; यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून सुमारे 2 हजार पोलीस अधिकारी, सेवक मंगळवारी (दि.31) दुपारपासून सोमवारी पहाटेपर्यंत रस्त्यावर उतरणार आहेत. ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह, छेडछाड किंवा हाणामारीसारखे प्रकार रोखण्याकडे पोलिसांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे. यासह परिमंडळ एक आणि दोन तसेच पोलीस ठाणे पातळीवर वेगवेगळा बंदोबस्त नेमण्यात आला आहे.

- Advertisement -

थर्टीफस्टच्या बंदोबस्तासाठी 150 पोलीस अधिकारी आणि एक हजार 500 पोलीस सेवक तैनात करण्यात आले आहे. पोलिसांच्या मदतीला गृहरक्षक जवानांसह स्ट्रायकींग फोर्स आणि अचानक उद्भवणार्‍या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य राखीव दलाची एक तुकडी देखील तैनात ठेवण्यात येणार आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजेपासून सोमवारी पहाटेपर्यंत बंदोबस्त कायम राहणार आहे.

परिमंडळ एक मध्ये 12 पोलीस निरीक्षक, 49 सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक, 411 कॉन्स्टेबल, 115 महिला कॉन्स्टेबल, 40 पुरुष तर 20 महिला होमगार्डस, चार स्ट्रायकिंग फोर्स पथके, एसआरपीएफचे एक पथक आणि 18 वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय पोलीस आयुक्तालय स्तरावरून अधिकचे 10 पोलीस निरीक्षक, 39 सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक,290 कॉन्स्टेबल, 105 महिला कॉन्स्टेबल असा बंदोबस्त देण्यात येणार आहे.

परिमंडळ दोनमध्ये नऊ पोलीस निरीक्षक, 37 सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक, 305 कॉन्स्टेबल, 42 महिला कॉन्स्टेबल, 195 होमगार्डस त्यात 55 महिला होमगार्डस, एसआरपीएफ तसेच 24 वाहने असे नियोजन करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तालयाकडून चार पोलीस निरीक्षक, 90 कॉन्स्टेबल, 13 महिला कॉन्स्टेबल, तीन वाहने असा अधिकचा बंदोबस्त पुरवण्यात येणार आहे.

ड्रंंक अ‍ॅण्ड ड्राईव्हची कडक कारवाई
शहर वाहतूक शाखेतर्फे महामार्ग, औरंगाबादरोड, पुणेरोड, त्र्यंबकरोड, गंगापूररोड, कॉलेजरोड, पेठरोड, दिंडोरीरोड, शहरातील चौक व प्रमुख रस्त्यांवर 42 ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे़. या नाकाबंदीच्या ठिकाणी वाहतूक शाखेचे 15 अधिकारी व 272 सेवक तैनात केले जाणार असून, 28 ब्रेथ अ‍ॅनालायझरच्या सहाय्याने मद्यपी वाहनचालकांची तपासणी केली जाणार आहे़. एकही मद्यपी वाहनचालक पोलिसांच्या नजरेतून सुटणार नाही, असे नियोजन करण्यात आले आहे़. या ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीनद्वारे शरीरात किती टक्के अल्कोहोल आहे हे कळणार असून, त्या प्रमाणानुसार ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हची कारवाई केली जाणार आहे.

पार्ट्यांवर करडी नजर
नववर्षस्वागताच्या उत्साहात काही घटना घडू नयेत यासाठी गर्दीची ठिकाणे विशेषतः मार्केट, मॉल्स, मंदिरे अशा ठिकाणी पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. वाहतूक विभागाकडून मद्यपी वाहनचालकांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. शहरातील प्रमुख रस्ते तसेच शहरातून जाणार्‍या महामार्गावर अवैध मद्य वाहतूक रोखण्यासाठी विविध तपासणी नाके सुरू करण्यात येणार आहेत. तसेच स्वतंत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तसेच पार्ट्यांचे आयोजन करण्यात आलेली हॉटेल व खासगी ठिकाणांवरही पोलिसांची करडी नजर असणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या