सातपूर । नाशिक शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर तब्बल आठ एकर परिसरावर ‘नाशिक फ्लॉवर पार्क’ची सुंदर अशी उभारणी करण्यात आली आहे. या फ्लॉवर पार्कमध्ये तीन लाखांपेक्षा नानाविध प्रकारच्या व रंगाच्या फुलांमध्ये साकारलेले पशू, पक्षी, डॉल, राइडस्, खाऊगल्ली यांसारख्या गोष्टी नाशिककरांना खुणावत आहेत. उद्यापासून (दि.1) हे पार्क पर्यटकांसाठी खुले होत आहे.
नगरसेवक शशिकांत जाधव, शंतनू आणि शुभम जाधव यांच्यासह गोपाळ पाटील, आर्किटेक्ट निधी पाटील यांच्या प्रयत्नांतून दुबईच्या मिरॅकल गार्डनच्या धर्तीवर देशातील हे पहिले फ्लॉवर पार्क नाशिकमध्ये उभे राहीले असल्याने ही नाशिककरांसाठी अभिमानाची बाब ठरणार आहे. अंजनेरी हिल्स, शुभम वॉटरपार्कच्या मागे हे पार्क उभारण्यात आले असून गेली वर्षभर त्यावर संबंधितांची मेहनत सुरू होती. आज ती प्रत्यक्षात आली आहे.
या पार्कच्या दिमाखदार उद्घाटन सोहळ्यास खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, मंत्री छगन भुजबळ, माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या दुपारी 1 वाजता त्याचे उद्घाटन होत आहे. यावेळी अनेक क्षेत्रातील नामांकित व्यक्ती, वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी कळवले आहे.