नाशिक : पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनीतून बाहेर पडलेल्या 117 व्या तुकडीतील संतोष कामटे यांना सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी (स्वॉर्ड ऑफ ऑनर) व बेस्ट कॅडेट इनडोअर स्डडीज (सिल्व्हर बॅटन)ने सन्मानित करण्यात आले. आपल्या यशाबद्दल बोलताना कामटे म्हणाले, हाताला मिळेल ते काम करून आमचे शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द ठेवून वडील अर्जुन हनुमंत कामटे यांनी अहोरात्र मेहनत घेतली.
वडिलांचे अविश्रांत कष्ट बघितल्यानंतर आपण जिद्दीने एपीएससीचा अभ्यास सुरू केला. नोकरीच्या अपेक्षेने येईल त्या परीक्षेला सामारे गेलो, तर प्रशिक्षण काळातही जिद्द व प्रामाणिक कष्टाच्या जोरावर ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ हा प्रशिक्षण काळातील सर्वोच्च सन्मान प्राप्त झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांना हा किताब बहाल करण्यात आला याचा खूप मोठा अभिमान असून वडिलांचे स्वप्न साकार केल्याचे समाधान मिळत आहे.
उगाव (ता.करमाळ, सोलापूर) या छोट्याशा गावात शेतमजुरी करणारे आमचे कुंटुंबिय आहे. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्यामुळे मी आई-वडिलांना शेतमजुरी करून हातभार लावत शिक्षण पूर्ण केले. चिखलठाण येथे दहावी व डी.एड.चे शिक्षण पूर्ण केले. यानंतर करमाळ येथे पुढील शिक्षण घेतले.
डीएड होऊनही शिक्षक भरतीच नसल्याने अखेर पदवीसोबतच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. नोकरीची गरज असल्यामुळे प्रत्येक परीक्षा देत गेलो. ’पीएसआय’ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी होण्याची जिद्द होती. कठोर मेहनत व शिस्तीचे काटेकोर पालन केल्यानंतर स्वॉर्ड ऑफ ऑनर किताब मिळाला. आई-वडिलांना मोठा आनंद झाला असून त्यांचे स्वप्न पूर्ण केल्याचे समाधानही आहे. यापुढे आपण प्रामाणिकपणे देशसेवा करणार आहोत.
– संतोष अर्जुन कामटे, प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक