Friday, May 3, 2024
Homeनाशिकलॉकडाऊन : के.के. वाघ तंत्रनिकेतनकडून विद्यार्थ्यांना ऑनलाईन अध्यापन

लॉकडाऊन : के.के. वाघ तंत्रनिकेतनकडून विद्यार्थ्यांना ऑनलाईन अध्यापन

नाशिकरोड । का.प्र.
सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळातही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी के.के. वाघ तंत्रनिकेतनच्या प्रशासनाने विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे देण्याला सुरुवात केली. तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर केल्यास प्रतिकुल परिस्थितीतही संधीचे सोने करता येते, याचा आदर्श वस्तुपाठ समाजापुढे ठेवला आहे.

टप्प्याटप्प्याने वाढत जाणारा लॉकडाऊन व मार्च-एप्रिल म्हणजे परीक्षेचा कालावधीत व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत संभ्रमावस्थेचा काळ. कारण परीक्षा तर होणार, परंतु कधी होणार, कशी होणार, प्रात्यक्षिक परीक्षांचे काय होणार, घरी थांबून आलेल्या अडचणींचे निराकरण कसे करणार अशा अनेक प्रश्नांची मालिका विद्यार्थ्यांसमोर उभी ठाकली. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या विविध शंका व त्यांचे निराकरण कसे करावे असा प्रश्न शिक्षकांना पडला.

- Advertisement -

‘वर्क फ्रॉम होम’ कितीही म्हटले तरी शिक्षणाच्या बाबतीत त्याचा वापर कसा करता येईल याबाबत या तंत्रनिकेतनचे अध्यक्ष व विश्वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य प्रकाश कडवे व सर्व शिक्षकांनी काम सुरू केले. त्यानुसार उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून घरबसल्या विद्यार्थ्यांना सर्व पद्धतीचे मार्गदर्शन कसे करता येईल यावर अभ्यास करण्यात आला.

त्यानुसार विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. सर्वप्रथम विविध विषयांचे व्हिडिओ तयार करून यूट्यूबद्वारे ते विद्यार्थ्यांपर्यंत पाहेचविण्यात आले. दि.१२ एप्रिलपर्यंत असे साडेचारशे व्हिडिओ तयार करून पर्यंत पोहोचवले. अजूनही अनेक व्हिडिओ अपलोड करण्याचे काम चालूच आहे. त्यानंतर ई-मेल, ईआरपी, व्हॉट्सअप आदींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्यात आले.

त्यानुसार आतापर्यंत विद्यार्थ्यांनी सुमारे 5000 होमवर्क पूर्ण करून ऑनलाईन माध्यमाचा वापर करून परत चाचणीसाठी पाठविले. शिक्षकांनी देखील तातडीने हे गृहपाठ तपासून विद्यार्थ्यांना त्यात दुरुस्त्या दिल्या. विद्यार्थ्यांना अनेक विषयांच्या नोट्स, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, मॉडेल अन्सर पेपर, प्रश्नपत्रिका आदी ऑनलाइन देण्यात आल्या. या सर्वांचा वापर विद्यार्थी घरी बसून करत आहेत.

विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी ‘झूम’ या प्लॅटफॉर्मचा वापर करून ऑनलाइन लेक्चरची मालिका सुरू करण्यात आली. आजपर्यंत सुमारे 13 हजार विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेतला आहे. याव्यतिरिक्त अनेक शिक्षक गुगल हँग आऊट, गूगल क्लासरूम व मूडल यांचा वापर करून विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे देत आहेत.

याशिवाय विद्यार्थ्यांचे टर्म वर्क, प्रोजेक्टदेखील ऑनलाइन तपासण्याचे काम सुरू आहे. या उपक्रमाबाबत संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, विश्वस्त समीर वाघ व सचिव के.एस. बंदी यांनी प्राचार्य कडवे व शिक्षकांचे कौतुक केले.

लॉकडाऊनचा कालावधी वाढत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता अबाधित ठेवण्यासाठी के.के. वाघ तंत्रनिकेतनच्या विश्वस्त मंडळींनी ऑनलाईन अध्यायनाचा आग्रह धरला. संपूर्ण स्टाफने मोलाचे सहकार्य केले. मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्याने विद्यार्थ्यांसह पालकवर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
-प्राचार्य प्रकाश कडवे

- Advertisment -

ताज्या बातम्या