Friday, May 3, 2024
Homeनाशिकचौक ‘कोंडी’: ‘मायको’ पार करताना थांबायचे कोणी?

चौक ‘कोंडी’: ‘मायको’ पार करताना थांबायचे कोणी?

नाशिक । बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर देवस्थान, औद्योगिक वसाहतींकडे जाण्यासाठीच्या प्रमुख मार्ग या चौकातून असल्याने चोवीस तास वर्दळ असणार्‍या या चौकात थांबायचे कोणी, हाच प्रश्न असल्याने प्रत्येकजण पुढे घुसतो आणि वाहतूक कोंडीस हातभार लावतो, असे चित्र आहे.

त्र्यंबकेश्वर, सातपूर तसेच अंबड औद्योगिक वसाहती, नवीन नाशिक, चांडक सर्कलमार्गे मुंबई, पुणे मार्गाला जोडणारे जवळचे मार्ग अशा सर्व ठिकाणी जाण्यासाठी या चौकातूनच मार्ग आहे. यामुळे या भागात चोवीस तास कायम गर्दी असते.

- Advertisement -

या चौकाच्या बाजूलाच टँकर भरण्यासाठीची विहीर आहे. या ठिकाणी टँकरच्या कायम रांगा लागलेल्या असतात. या शहरात येणार्‍या कोपर्‍यावर अनेकदा रस्त्यावरच टँकर पार्क केलेले असतात. चांडक सर्कलकडे जाणार्‍या मार्गावर तसेच तिकडून येणार्‍या मार्गांवर अनेक नवनवीन खासगी कार्यालये, बँकांच्या शाखा, शोरूमसह अनेक घरगुती साहित्य विक्रीची कार्यालये थाटली गेलेली आहेत. परंतु त्यांना पार्किंगची व्यवस्था नसल्याने बहुतांश कार्यालयातील दुचाकी तसेच चारचाकी वाहने ही रस्त्याच्या कडेलाच उभी करून दिलेली असतात. याचा चौकातील वाहतूक कोंडीवर अधिक प्रभाव पडतो.

मायको चौकाच्या उत्तर कोपर्‍यात होलाराम कॉलनीतून येणारा एकेरी मार्ग आहे. मात्र अनेक वाहने चांडक सर्कल, नवीन नाशिकच्या दिशेने येऊन काही अंतर उलट दिशेने जाऊन होलाराम कॉलनी रस्त्यावरून जाण्याचा अट्टहास करतात. यामुळे त्र्यंबकच्या दिशेने आलेल्या वाहनांना मोठ्या प्रमाणात अडथळा येतो. या चौकातील रस्त्यांची रूंदी अधिक असल्याने या चौकाकडे सर्वच दिशेने येणारी वाहने अतिशय भरधाव वेगात येतात. यामुळे या ठिकाणी अपघात होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे येथील व्यावसायिक सांगतात.

दररोज प्रामुख्याने सकाळी 9 ते 11 व रात्री 7 ते 10 या कालावधीत या चौकात कोंडी होण्याची वेळ आहे. शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच कंपन्यांची सुटी होण्याची ही वेळ असल्याने बरोबर या कालावधीत मायको चौकातही वाहतुकीचे तीन तेरा वाजतात. तसेच या चौकाला कायमच बेकायदेशीर फलकांचा गराडा असतो. यामुळे अनेकदा वाहनचालकांना रस्ता तसेच पुढील वाहने न दिसल्याने अपघात झाले आहेत. पोलीस तसेच पालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या