सिन्नर : कोरोना आजार होऊ नये म्हणून सर्वांनी गरम पाणी प्यावे, मी खूप प्रयत्न केले, काळजी घेतली पण यश आले नाही. म्हणून मी आता थेट देवाकडे साकडे घालायला चाललो आहे, अशी चिठ्ठी लिहून एका ३० वर्षीय तरुणाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (दि.21) पहाटे तालुक्यातील शहापूर (दातली) येथे घडली.
लक्ष्मण नामदेव बर्डे असे या मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या आजीचा आज दशक्रिया विधी होता. कुटुंबातील मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत देवनदी तीरी हा विधी पहाटे ६ वाजेपुर्वीच उरकून घेण्यात आला.
यावेळी पिंडाला पाणी द्यायला तसेच केस काढायला लक्ष्मण न आल्याने त्याचा भाऊ सुदाम घराकडे आला असता अंथरुणात त्याला लग्नपत्रिकेच्या पाठीमागील कोऱ्या जागेवर वरील मजुकर लिहिलेली चिट्ठी आढळून आली. त्याने लागलीच इतर नातेवाईकांना ही बाब सांगत लक्ष्मणचा शोध सुरू केला असता खोपडी शिवारात शिवाजी गुरुळे यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत लक्ष्मणचा मृतदेह आढळून आला.
याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात कळवण्यात आल्यावर हवालदार लक्ष्मण बदादे यांनी धाव घेत मृतदेह सिन्नर नगरपालिका दवाखान्यात हलवला. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत लक्ष्मण याने करोना आजाराबद्दल भीती व्यक्त केली होती. मी खूप काळजी घेतली पण नाईलाज झाला. सर्वांनी गरम पाणी प्यावे अशी विंनती त्याने या चिठ्ठीत केली आहे.
सर्वांना सुखी ठेव अशी विनंती करायला मी देवाकडे चाललो आहे असे सांगत त्याने रवी नामक मित्राची माफी मागितली आहे. तू सर्वांची काळजी घे, पुढच्या जन्मी आपण एकाच आईच्या पोटी जन्म घेऊ, तू माझा मोठा भाऊ हो असे त्याने रवीला उद्देशून चिट्ठीत लिहिले आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. वर्षभरापूर्वी वडिलांचे, तर गेल्या आठवड्यात आजीचे निधन झाल्यानंतर बर्डे कुटुंबात आज तिसरी घटना घडली.
गेल्या तीन चार दिवसांपासून घशात थोडा त्रास होत असल्याने लक्ष्मण काहीसा अस्वस्थ होता व त्यामुळे त्याने कोरोनाचा धसका घेतल्याचे बोलले जात आहे. एकलव्य आदिवासी संघटनेचा पदाधिकारी असलेल्या लक्ष्मणच्या पश्चयात आई, पत्नी व लहान भाऊ असा परिवार आहे.