Friday, May 3, 2024
Homeनगरनेवासा तालुक्यात गुटखा, तंबाखू व सिगारेटची दुप्पट दराने विक्री

नेवासा तालुक्यात गुटखा, तंबाखू व सिगारेटची दुप्पट दराने विक्री

किराणा दुकानदार देताहेत माल मिळत नसल्याचे कारण

सोनई (वार्ताहर)- लॉकडाऊन असल्याने माल मिळत नसल्याचे कारण देत किराणा दुकानदारांकडून 10 रुपयांची तंबाखू पुडी 30 रुपयांना तर विडी, सिगारेटसह बंदी असलेल्या गुटख्याची शहरासह ग्रामीण भागातही दुप्पट दराने विक्री करण्यात येत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून अमली पदार्थांच्या विक्रीला बंदी घालण्यात आली असली, तरी गुटखा, तंबाखू, सिगारेटसारखे पदार्थ सहजरीत्या उपलब्ध होत आहेत. त्यामुळे बंदीतही हा माल उपलब्ध कसा होतो? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीला करोनाच्या पार्श्वभूमीवर बंंदी घालण्यात आली असली तरी, तंबाखू, विडी, सिगारेटच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. असे असले तरी तल्लफ भागवण्यासाठी हा खर्च सहन करण्याची ग्राहकांची तयारी आहे. कोरोनामुळे तंबाखूजन्य पदार्थांची सर्वाधिक विक्री करणार्‍या पानटपर्‍या सक्तीने बंद केल्या आहेत. तरीही अनेक ठिकाणी किराणा दुकानांमध्ये ठराविक ग्राहकांना वाढीव पैसे देऊन तंबाखूजन्य पदार्थ सहजगत्या उपलब्ध करून देण्यात येत असल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत.

- Advertisement -

लॉकडाऊन व बंदीमुळे तंबाखूजन्य पदार्थांचा तुटवडा निर्माण झाल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात येते. वाढीव किमतीला होलसेल दरात तंबाखू, सिगारेट, गुटख्याची पाकिटे घेऊन त्यांची सर्रास चढ्या भावाने विक्री सुरू आहे. असाच प्रकार परमिट रूम बियर बार देशी-विदेशी दारूचे लायससन्स धारकांनी या लॉकडाऊनला धाब्यावर बसवायचे ठरवले आहे. आपल्या कमाईसाठी त्यांनी ठराविक ग्राहकांना या बंदीचा काहीच परिणाम जाणवू दिला नाही पण त्यासाठी त्यांनी वाढीव दराने विक्री सुरू केली आहे.

याकडे राज्य उत्पादन शुल्क किंवा एलसीबी ने मात्र दुर्लक्ष केले आहे. कोरोना संसर्गापासून लोकांचे आरोग्य जपण्याचा शासनाच्या उद्देशालाच दुकानदारांकडून हरताळ फासला जात आहे. तालुक्यात काही भागात अशा पद्धतीने चाललेले धंदे स्थानिक प्रशासन व माध्यम प्रतिनिधींच्या समोर आलेली आहेत. मात्र पुढे काही कारवाई केली की नाही? हे मात्र समजू शकलेले नाही.

छुप्या दारु विक्रीकडे उत्पादन शुल्कचे दुर्लक्ष

नेवासा (तालुका वार्ताहर)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्व बियरबार व परमिटरूम बंद असताना तालुक्यातील विविध ठिकाणी दारू विक्री सुरु असून राज्य उत्पादन शुल्क विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे.

ग्रामीण भागात चोरी छुपी दारू विक्री सुरू आहे. यात देशी व गावठी दारूचे प्रमाण सर्वाधिक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील एकवीस दिवसापासून नेवासा शहरासह तालुक्यात अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद आहेत. मात्र अवैध दारू विक्रीला जोर आला असून चढ्या भावाने मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री होत आहे.

नेहमीची परवानाधारक दारू दुकाने बंद असल्याने तसेच शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असल्याने तारेवरची कसरत करून या अवैध दारू विक्री करणार्‍यांचा शोध या मद्यपींना घ्यावा लागतो. देशी दारू बरोबरच विदेशी दारू व बियर साठीही दुपटीने म्हणजे तीनशे रुपयांपेक्षा जास्त रक्कम या मद्यपींना मोजावी लागत आहे. तर काही विक्रेते घरपोच सेवा देत असून चालता बोलता दारू विक्री करत असल्याचे काही मद्यपींनी सांगितले.

नेवासा पोलिसांनी कार्यक्षेत्रात अकरा ठिकाणी छापे मारून अवैध दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल केले याउलट राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई होताना दिसत नाही. एकवीस दिवसांत तालुक्यात अवघ्या चार वारस केस झाल्याचे अधिकारी सांगत आहे. तंबाखू आणि सिगारेटचे दर देखील गगनाला भिडले आहेत. 13 रुपयाला मिळणारी तंबाखूची पुडी आता 20 रुपयाला विकली जात आहे. किराणा दुकानातही भेसळयुक्त किराणा विकला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या