पाटपाणी कृती समितीची आडगाव येथील मेळाव्यात मागणी
पिंपरी निर्मळ (वार्ताहर) – कालवे अगोदर व नंतर धरण अशी जलनीती असताना निळवंडे धरणाच्या बाबतीत संपूर्ण जलनीती धाब्यावर बसविण्यात आली आहे. निळवंडेचे कालवे अकोले तालुक्यात अतिशय संथगतीने सुरू असल्याची बाब निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या पाहणी दौर्यात स्पष्ट झाली होती. त्यामुळे यावर लाभधारक शेतकर्यांचा आडगावमध्ये मेळावा घेऊन कामांच्या सद्यस्थितीचा लेखाजोखा मांडण्यात आला. यावेळी अकोलेतील ठेकेदार बदलण्याची मागणी सर्व शेतकर्यांनी खासदार सदाशिव लोखंडे व जलसंपदा विभागाकडे केली.
पावसाळ्यापूर्वी अकोले तालुक्यातील निळवंडे कालव्यांची कामे सुरू झालेली आहेत. पावसाळ्यात कामे संथ असणार हे समितीने गृहीत धरले होते. मात्र पावसाळा संपताच निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी कामाचा पाहणी दौरा केला. त्यात कामांची गती संथ असल्याचे लक्षात आले. या सर्व गोष्टींची माहिती लाभधारक शेतकर्यांना झाली पाहिजे या उद्देशाने एका शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
अकोलेतील कामांचा लेखाजोखा समितीचे कार्यकर्ते सुखलाल गांगवे यांनी मांडला. गेली 10 वर्षांपासून ठेकेदार कामात हलगर्जीपणा करत असल्याचे त्यांनी शेतकरी व लोकप्रतिनिधींच्या लक्षात आणून दिले. यावर बोलताना खा. सदाशिव लोखंडे यांनी कामाला गती देण्यासाठी आपण सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. ठेकेदाराची मुजोरी यापुढे सहन केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निळवंडेसाठी आपण गल्लीपासून दिल्लीपर्यंत आवाज उठवला आहे, त्यामुळे जर ठेकेदार मुजोरी करत असेल तर त्याची गय केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निळवंडे पाटपाणी कृती समितीचे प्रत्येक कामावर बारीक लक्ष आहे. ठेकेदाराला मोठे अधिकारी पाठीशी घालत असल्याचे लक्षात आले आहे. बैठकांमध्ये ठेकेदार कोणतेही थातुरमातुर कारणे सांगून कामापासून पळ काढत असल्याचे मत निळवंडे पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके यांनी मांडले. यामुळे दीड वर्षात पाणी आणायचे असेल तर ठेकेदार बदलल्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एक महिन्याची ठेकेदाराला मुदत देण्यात आली आहे.
त्यानंतर त्याच्यात सुधारणा झाली नाही तर त्याच्यावर कार्यवाहीचे आश्वासन जलसंपदा विभागाकडून देण्यात आले. दीड ते दोन वर्षात लाभक्षेत्राला पाणी देण्याचे नियोजन असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले. जलसंपदा विभागाचे प्रतिनिधी म्हणून कालवा विभागाचे कनिष्ठ कार्यकारी अभियंता माने उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना दत्ता भालेराव यांनी केली तर डॉ. एकनाथ गोंदकर, सुरेश थोरात, डॉ. शेखर बोर्हाडे, श्रीकांत मापारी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. मेळाव्याला लाभधारक शेतकर्यांबरोबर धनजंय गाडेकर, उत्तमराव घोरपडे, बाळासाहेब रहाणे, काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष लताताई डांगे, रमेश विखे, राजेंद्र सोनवणे, भाऊसाहेब शिंदे, विलास गुळवे, जालिंदर कांडेकर, सर्जेरावर घोरपडे, विजय गोर्डे, शिवाजी शेळके, प्रभाकर गायकवाड, अण्णासाहेब वाघे, संदीप रहाणे, मारुती मुरादे, बबन सानप, चंद्रभान गुंजाळ, बाळासाहेब बोधक, ज्ञानदेव मगर, साहेबराव पडवळ, बाबासाहेब निर्मळ, दौलत घोरपडे, रामदास लहामगे, आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी शिवाजी शेळके होते. सूत्रसंचालन बाळासाहेब रहाणे यांनी केले. समितीचे सचिव विठ्ठल घोरपडे यांनी आभार मानले.