Friday, May 3, 2024
Homeनगरउद्याने, हॉटेल, चौपाट्या बंद करा; महापौरांच्या सूचना

उद्याने, हॉटेल, चौपाट्या बंद करा; महापौरांच्या सूचना

कोरोनाच्या वातावरणामुळे 15 दिवसांसाठी कठोर उपाययोजना करण्याचे आदेश

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने आगामी 15 दिवसांसाठी कठोर निर्णय घ्यावेत. समाजामध्ये जनजागृतीसाठी विविध उपाययोजना करतानाच शहरातील उद्यााने, हॉटेल, धार्मिक स्थळे व विविध ठिकाणी असणार्‍या चौपाट्या (खाद्य पदार्थ विक्रीची ठिकाणे), जॉगिंग ट्रॅक, मंगल कार्यालय, शॉपिंग कॉम्प्लेक्स बंद करण्यात यावेत, अशा सूचना महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिल्या.

- Advertisement -

महापालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेण्यासाठी वाकळे यांनी बैठक घेतली. यावेळी आयुक्त श्रीकांत मायकलवार, उपमहापौर मालनताई ढोणे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती लताताई शेळके, उपसभापती सुवर्णाताई गेनप्पा, उपायुक्त सुनील पवार व डॉ. प्रदीप पठारे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष नगरसेवक महेंद्र गंधे, मनोज कोतकर, वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे, वैद्यकीय उपआरोग्याधिकारी डॉ. सतीश राजूरकर, डॉ.शंकर शेडाळे, डॉ. कविता माने, डॉ. आरती डापसे, डॉ. अश्‍विनी मरकड, डॉ. आएशा शेख, मुख्य स्वच्छता निरिक्षक राजकुमार सारसर, एसटी महामंडळ तारकपूर आगाराचे अविनाश कल्हापुरे, शहर बससेवा व्यवस्थापक रावसाहेब काकडे आदी उपस्थित होते.

महापौर वाकळे यांनी डॉ. बोरगे यांच्याकडून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. नागरिकांना ताप, खोकला आणि श्‍वास घेण्यास त्रास होत असेल स्वत:हून कोणताही उपचार न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेण्याचे व महापालिका आरोग्य केंद्राशी संपर्क करण्याचे आवाहन महापौर वाकळे यांनी केले. तसेच शहरातील गर्दीच्या ठिकाणांची यादी करून तेथील व्यवहार बंद करण्याच्या सूचना दिल्या.

यामध्ये उद्यानांसह हॉटेल्स, धार्मिक स्थळे यांचाही समावेश आहे. शहरात सायंकाळनंतर खाद्य पदार्थाच्या हातगाड्या विविध ठिकाणी रस्त्याच्या कडेला, चौकात लावल्या जातात. तेथे गर्दी मोठ्या प्रमाणात असते. विशेषतः तरूणांची गर्दी मोठी असते. ते देखील बंद करण्याच्या सूचना करण्यात आल्या. यासाठी कठोर भूमिका घेण्याच्याही सूचना दिल्या. आगामी पंधरा दिवसांसाठी या उपाययोजना कठोरपणे करण्याचे त्यांनी सांगितले.

आयुक्त मायकलवार रुजू
महापालिका आयुक्तपदी श्रीकांत मायकलवार यांची नियुक्ती करण्यात आली. शुक्रवारी शासनाने तसा आदेश काढला. मायकलवार सोमवारी सकाळी महापालिकेत रुजू झाले. त्यांनी रूजू झाल्यानंतर प्रथम आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. तसेच दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी शासनाने घेतलेल्या कोरोनासंदर्भातील व्हीसीलाही हजेरी लावली. सायंकाळी महापौर वाकळे यांनी घेतलेल्या बैठकीस ते उपस्थित होते.

करवसुलीला कोरोनाची बाधा
मार्चअखेर असल्यामुळे महापालिकेने करवसुलीची मोहीम तीव्र केलेली आहे. कर्मचार्‍यांना यासाठी उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत 50 कोटी रुपये वसूल झाले आहेत. मात्र आता थकबाकीदारांनी कोरोनाचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. वसुलीसाठी आलेल्या कर्मचार्‍यांना जवळ येऊ दिले जात नाही. कोरोनाची भीती असल्याचे सांगितले जाते. तसेच परिसरात परदेशातून आलेले काही जण असल्याचे सांगत घराबाहेर येण्यासही नकार दिला जात आहे. त्यामुळे वसुली मोहिमेला कोरोनाची बाधा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या