Saturday, May 4, 2024
Homeनगरलोकसहभागामुळे पाणी पोहचले वांगी बुद्रुकला

लोकसहभागामुळे पाणी पोहचले वांगी बुद्रुकला

लाख कालव्याच्या उर्वरित कामासाठी लोकसहभागातून पुढे येण्याची गरज!

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- प्रवरा नदीपात्रात ब्रिटीशकाळात बांधण्यात आलेल्या लाख बंधार्‍याच्या अनेक वर्षापासून रखडलेल्या कालव्याच्या कामांचा मागील वर्षी ‘श्रीगणेशा’ झाला. त्यामुळे प्रवरा नदीपात्रात सोडल्या जाणार्‍या पाण्यातून लाख बंधार्‍याखालील कालव्यांनाही पाणी मिळत आहे. मात्र अद्यापही बहुतांशी भागात लाख कालव्याचे काम करणे बाकी असल्याने लाभधारक शेतकरी पाण्यापासून वंचित आहेत. अशा परिस्थितीत वांगी बुद्रुकच्या ग्रामस्थांनी पुढे येत लोकसहभागातून वांगी बुद्रुकपर्यंत कालव्याचे काम करून पाणी आणले आहे.

- Advertisement -

दरम्यान, लोकसहभागातून पुढे येऊन या कालव्याचे उर्वरित काम पूर्णत्वास नेल्यास हा भाग सुजलाम् सुफलाम् होण्यास मोठी मदत होणार आहे. तर यासाठी विविध सामाजिक संघटना, राजकीय नेत्यांनीही हातभार लावणे गरजेचे आहे. प्रवरा नदीपात्रावर ब्रिटीश काळात लाख बंधार्‍याचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर या बंधार्‍याखाली कालव्यांची निर्मिती होऊन या कालव्याद्वारे या भागातील लाडगाव, भेर्डापूर, मालुंजा, वांगी खुर्द, वांगी बुद्रुक, खिर्डी तसेच नेवासा तालुक्यातील पाचेगाव, पुनतगाव, नागफणीसह अनेक गावांना शेतीसाठी पाणी दिले जात असे.

मात्र वर्षानुवर्षे या कालव्यांची दुरुस्ती करण्यात न आल्याने या भागातील कालवे नामशेष होण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे मागील वर्षी लाख कालव्याच्या कामास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती उत्तर नगर यांनी सुरुवात केली. यासाठी या समितीतील रवींद्र कोळपकर, जितेंद्र शेळके, राजेंद्र भुजाडी, वैभव धुमाळ, महेश देशपांडे यांच्यासह विविध सामाजिक संघटनेसह राजकीय नेत्यांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला. तर या कामासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते हेरंब औटी, प्रताप भोसले यांनीही आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेऊन इतरांना प्रोत्साहित केले. त्यामुळे भंडारदरा व निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्यातून लाख बंधार्‍याखालील या कालव्यांद्वारे पाणी वाहते झाले आहे.

दरम्यान, लाख बंधार्‍याखालील लाभधारक शेतकर्‍यांना वरदान ठरलेल्या लाख कालव्याच्या उर्वरित कामांना गती मिळणे गरजेचे आहे. वांगी खुर्द पर्यंत या कालव्याचे काम झालेले आहे. मात्र त्यापुढील बहुतांश काम बाकी असल्याने कालव्याद्वारे पूर्ण क्षमतेने पाणी जाण्यास अडचणी येतात. तर अनेक ठिकाणी कालव्यावरील पुलाचे कामही बाकी आहे. सध्या प्रवरा नदीपात्रातील बंधारे भरण्यासाठी भंडारदरा व निळवंडे धरणातून सोडण्यात आलेेले पाणी या कालव्यांनाही सोडण्यात आले. मात्र कालव्याचे काम पूर्ण झालेल्या भागापर्यंतच पाणी पोहचल्याने त्या पुढील शेतकरी वंचित राहिले आहे.

अशा परिस्थितीत सध्या उन्हाळ्यामुळे जाणवणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन पुढे येऊन वांगी बुद्रुक ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून जेसीबीच्या साहाय्याने वांगी बुद्रुकपर्यंत कालव्याचे काम पूर्ण केले. यासाठी कल्याण लकडे, जगन्नाथ बिडगर, अण्णा कांबळे, किशोर कांबळे, अतुल कांबळे, भाऊसाहेब बिडगर, लाला हाळनोर, दत्तात्रय लकडे, कृष्णा हाळनोर, संभाजी कांबळे, बाळासाहेब कांबळे, दत्तू कांबळे, विठ्ठल पिसाळ, आसाराम पिसाळ, पांडुरंग पिसाळ, ठकानाथ पिसाळ, बापू पिसाळ, चैनीराम पिसाळ, पोपट चितळकर, विलास कांबळे, रावसाहेब माने, साईनाथ हाळनोर, ज्ञानेश्वर हाळनोर, विक्रम हाळनोर, अण्णा हाळनोर, दिगंबर हाळनोर, शिवाजी कांबळे, बाबासाहेब कांबळे, गंगाभाऊ कांबळे, रावसाहेब डोमाळे, बबनराव माने, धनंजय माने, परशुराम माने आदींचे सहकार्य लाभले. त्यामुळे वांगी बुद्रुक ग्रामस्थांप्रमाणेच या भागातील लाभधारक शेतकर्‍यांनी लोकवर्गणी व लोकसहभागातून या कालव्याचे काम पूर्ण करण्यासाठी एकत्रित येणे गरजेचे आहे.

दरम्यान, दिवसेंदिवस घटत चाललेल्या पर्जन्यमानामुळे पाणी टंचाईची मोठी समस्या जाणवत आहे. तर शासनही विविध योजना राबवून जलसंधारणासारख्या कामांना प्रोत्साहान देऊन मदत करत आहेत. तर भविष्यातील पाणी टंचाईचे संकट डोळ्यासमोर ठेवून शेतकर्‍यांनीही लोकसहभागातून अशा कामांसाठी पुढे येण्याची गरज आहे.

सर्वांच्या सहकार्याची गरज!
उर्वरित राहिलेले काम सर्वांनी सहकार्य केल्यास पाणी बंद झाल्यावर पूर्ण करावयाचे आहे. ज्या संघटनेने काम घेतले आहे. त्यांना लोकवर्गणीतून मदत करावयाची आहे. म्हणजे प्रवरा नदीला पाणी आल्यानंतर लाख कॅनॉलमध्ये पाणी येऊन लाभक्षेत्रातील पाणी पातळी वाढण्यास मदत होईल. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन हिंद सेवा मंडळाचे संचालक कल्याण लकडे, वांगी बुद्रुकचे सरपंच जगन्नाथ बिडगर, वांगी खुर्द सरपंच काका साळे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या