पालकमंत्री । गडाखांचे पारडे जड
अहमदनगर (प्रतिनिधी) – ठाकरे सरकारमधील मंत्र्यांच्या खातेवाटपाचा निर्णय आज-उद्या होईल असे सांगितले जात असतानाच नगरच्या पालकमंत्री पदासाठी मंत्री बाळासाहेब थोरातांचे भाचेजावई शंकरराव गडाखांच्या नावाची चर्चा सुसाट सुरू आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार राष्ट्रवादीनेही पालकमंत्री पदावर दावा सांगितला असतानाच थोरातांचे नावही चर्चेत आले आहे. मात्र, मुख्यमंत्री ठाकरे हे गडाखांसाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे नगरचे पालकमंत्री गडाखच होतील असा दावा त्यांचे समर्थक करत आहेत.
महिनाभराने ठाकरे सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पण अजूनही मंत्र्यांना खातेवाटप झालेले नाही. कोणत्याही क्षणी खातेवाटप होईल असे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितले, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते नबाब मलिक यांनी सोमवारचा मुर्हूत सांगितला आहे. खातेवाटपास विलंब होत असला तरी पालकमंत्री पदासंदर्भात महाविकास आघाडीचा फॉर्म्युलाही ठरला आहे.
ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाचा मंत्री त्या जिल्ह्याचा पालकमंत्री असे सूत्र निश्चित झाल्याचे समजते. त्यानुसार शिवसेना-राष्ट्रवादीला प्रत्येकी 13 तर काँग्रेसला 10 जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळू शकते. असे असले तरी नगर जिल्ह्यात शिवसेनेला ताकद देण्याकरीता मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्री गडाखांच्या पालकमंत्री पदासाठी आग्रह धरल्याची माहिती आहे. जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नाही. त्यामुळे शिवसेना पक्ष संघटन मजबूत करण्याची जबाबदारी मंत्री गडाखांवर टाकण्यात आल्याचे समजते. मंत्री शंकरराव गडाख हे नगरचे पालकमंत्री असतील असे जवळपास निश्चित झाल्याचे सांगण्यात आले.
मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही पालकमंत्री पदासाठी जोर लावला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अन् जिल्ह्यातही ज्येष्ठ असल्याने त्यांनी नगरच्या पालकमंत्री पदावर दावा केल्याचे सांगण्यात आले. असे असले तरी दस्तुरखुद्द मुख्यमंत्री ठाकरे हेच गडाखांसाठी अनुकुल असल्याने त्यांचे पारडे असल्याचे समजते.
समर्थकांचा दावा
मंत्री शंकरराव गडाख हे सयंमी, मितभाषी आहेत. सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांशी गडाख कुटुंबाचे स्नेहाचे, मैत्रीचे संबंध आहेत. त्यामुळे गडाखांच्या नावाला कोणी विरोध करतील असे वाटत नाही. पहिल्यादांच मंत्री पदाची शपथ घेणारे शंकरराव गडाख आता नगरचे पाकलमंत्री होतील असा दावा त्यांचे निकटवर्ती करत आहेत.
नाते अन् स्नेह
मंत्री थोरात यांची भाची अन् अप्पासाहेब राजळे यांची कन्या सुनिता या मंत्री शंकरराव गडाख यांच्या अर्धांगिनी आहेत. मंत्री गडाख हे थोरातांचे भाचेजावई असा नातेसंबंध सर्वश्रृत आहे. नगरच्या पालकमंत्री पदासाठी भाचेजावई अन् सासरे यांच्यातच रस्सीखेच सुरू आहे. त्यातच गडाख हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे अन् माजी मंत्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी असलेले स्नेहपूर्ण संबंध पाहता राष्ट्रवादीही गडाखांसाठी अनुकुल असल्याचे समजते. असे असले तरी नगरच्या पालकमंत्री पदासाठी थोरात-गडाखांत रस्सीखेच सुरू असून नगरची लढाई कोण जिंकतो याकडे नगरकरांचे लक्ष लागून आहे.