पाचपुतेना धक्का देत राष्ट्रवादीचा झेंडा
श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी)- पंचायत समिती च्या सभापती उपसभापती निवडीत भाजपच्या पंचायत समिती सदस्या आशा सुरेश गोरे यांनी ऐनवेळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला पाठिंबा दिल्याने माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते यांना धक्का देत राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप यांनी काल झालेल्या पंचायत समितीच्या सभापतिपदी गीतांजली शंकर पाडळे तर उपसभापतिपदी रजनी सिद्धेश्वर देशमुख यांची निवड करून पंचायत समिती वर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा झेंडा फडकवला.
श्रीगोंदा पंचायत समिती मध्ये भाजपचे 7, तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे 5 सदस्य होते. पंचायत समिती ही भाजपच्या ताब्यात होती. भाजपचे सदस्य अमोल पवार यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे भाजप चे 6 व आघाडीचे 6 असे संख्याबळ झाले होते.
अडीच वर्षांच्या कार्यकाळा नंतर सभापती पदाचे आरक्षण हे अनुसूचित जाती जमाती साठी राखीव झाल्याने काल झालेल्या निवडीत सभापती पदासाठी आघाडीकडून गीतांजली शंकर पाडळे तर उपसभापती पदासाठी रजनी सिद्धेश्वर देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर भाजपकडून सभापती पदासाठी नानासाहेब जनार्दन ससाणे तर उपसभापती पदासाठी मनीषा शंकर कोठारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
या निवडीत भाजपच्या पंचायत समिती सदस्या आशा सुरेश गोरे यांनी ऐनवेळी काँग्रेस राष्ट्रवादीकाँग्रेस आघाडीला पाठिंबा दिल्याने भाजपला खिंडार पडत पंचायत समितीच्या सदस्या गीतांजली पाडळे यांना 6 विरुध्द 5 अशा मताने आघाडीच्या गीतांजली पाडळे यांची सभापतिपदी तर उपसभापतिपदी रजनी देशमुख यांची निवड झाली.
श्रीगोंदा पंचायत समितीची निवडणूक 16 फेब्रुवारी 2017 रोजी होऊन त्यामध्ये बारा गणांतील सात सदस्य भाजपचे, तीन सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि दोन सदस्य काँग्रेसचे निवडून आले. भाजपने आपल्या सात सदस्यांची गट नोंदणी करून अमोल पवार याना गटनेता केले होते. तथापि त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने ते पंचायत समिती सदस्य म्हणून अपात्र ठरले.
भाजपने राहिलेल्या सहा सदस्यांची गट नोंदणी जिल्हाधिकारी यांच्या पुढे 3 जानेवारी 2020 रोजी करून शहाजी हिरवे यांना गटनेते केले. दिनांक 7 जानेवारी 2020 रोजी पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती यांची निवड झाली. यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या गीतांजली शंकर पाडळे (राष्ट्रवादी काँग्रेस) या सभापती पदासाठी सहा मते मिळून विजयी झाल्या. तर भाजपचे नानासाहेब जनार्धन ससाणे यांना पाच मते मिळाली.
विखेंचा करिष्मा नाहीच
श्रीगोंदा पंचायत समिती मध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब शेलार आणि सिध्देश्वर देशमुख या विखे समर्थकांनी भाजपला मतदान न करता आघाडीच्या उमेदवारांना मतदान केल्याने विखे समर्थक यांचा करिष्मा दिसलाच नाही.
तर गोरे अपात्र ठरणार
निवडणुकीत भाजपचे संख्याबळ सहा असताना भाजपच्या आशा सुरेश गोरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सभापती व उपसभापती पदाच्या उमेदवारांना मतदान केले. त्यामुळे भाजपचे दोन्ही उमेदवार पराभूत झाले. दरम्यान भाजपचे गटनेते शहाजी हिरवे यांनी आपल्या सहा उमेदवारांना पक्षाचा व्हीप बजावलेला आहे. त्यामुळे भाजपच्या आशा सुरेश गोरे या 1986 च्या पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्र ठरू शकतात.आशा गोरे यांना आता न्यायालयीन लढाईला सामोरे जावे लागेल. श्रीगोंदा पंचायत समितीची मुदत 2 वर्षे 1 महिना राहिलेली आहे.