Monday, May 6, 2024
Homeनगरनगरमधील माळीवाडा, सुभाष चौक प्रशासनाकडून सील

नगरमधील माळीवाडा, सुभाष चौक प्रशासनाकडून सील

करोना हॉटस्पॉट : दुकानांसह बाजारपेठ बंद; पोलिसांचा ताफा तैनात

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील सुभेदार गल्लीत अर्धा डझन करोना पॉझिटिव्ह पेशंट होताच प्रशासनाने हॉटस्पॉटचे निर्बंध कडक केले. सुभेदार गल्लीपासून दोन किलोमीटर परिसरातील दुकाने शनिवारी पोलिसांनी बंद केली. त्याची झळ थेट नेता सुभाष चौक व माळीवाड्यापर्यंत पोहचली. हॉटस्पॉटचे निर्बंध काटेकोरपणे पालन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्यानंतर नगरची मेन बाजारपेठ बंद झाली आहे.

- Advertisement -

लॉकडाऊन नियमांत थोडीशी शिथीलता मिळताच कापडबाजार, चितळे रोड, माळीवाडा भागातील दुकाने सुरू झाली. मात्र त्यानंतर सुभेदार गल्लीतील 70 वर्षीय महिलेस करोना झाला. या महिलेच्या संपर्कातील सून, मुलगा, शेजारी व दवाखान्याची रिसिप्शनिस्टदेखील बाधित झाले. शुक्रवारी या महिलेच्या संपर्कातील आणखी एक तरुण करोना बाधित निघाला. करोना पेशंटची संख्या पाच होताच कलेक्टरांनी तो भाग हॉटस्पॉट घोषित केला. सुभेदार गल्लीपासून दोन किलोमीटर परिसर सील करण्यात आला.

दोन किलोमीटच्या परिघात येत असूनही चितळे रोड, माळीवाडा भागातील दुकाने सुरूच होती. शनिवारी पोलिसांचा ताफा या भागात पोहचला. ध्वनीक्षेपकावरून दुकाने बंद करण्याचे फर्मान पोलिसांनी सोडले. अचानक झालेल्या या पोलीस वाणीने अफवांचा बाजार गरम झाला.

मात्र, सुभेदार गल्लीतील करोना बाधितांची संख्या वाढत आहे. झेंडीगेट परिसर हॉटस्पॉट असून दोन किलोमीटरपर्यंत त्याची व्याप्ती आहे. त्याची अंमलबजावणी सुरू असल्याचे पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले. धोका नको म्हणून ही कारवाई केली जात असल्याने नागरिकांनीही सहकार्य करत दुकाने बंद केली. माळीवाडा, चितळे रोडसह शहरातील मध्यवर्ती भागातील सुरू असलेली दुकाने बंद करण्याचे आवाहन पोलिसांकडून ध्वनिक्षेपकावर करण्यात आले.

माळीवाडा, चितळे रोड, पंचपीर चावडी, चौपाटी कारंजा, नेता सुभाष चौक दोन किलोमीटरच्या परिसरात येत असल्याने सुभेदार गल्लीची झळ या भागाला बसली. दरम्यान जिल्हा प्रशासनने करोनापासून बचावासाठी साखळी तोडण्यासाठी सुभेदार गल्लीलगतच्या परिसरातील हॉटस्पॉटमधील आजपासून निर्बंध कडक करण्यास सुरुवात केली आहे.

पोलीस ड्रोन कॅमेर्‍याने ठेवणार नजर
शहरात 13 मे रोजीपासून करोना विषाणूच्या संसर्गाने बाधित रुग्ण वाढत आहेत. शहरातील मध्यवर्ती भाग आणि सारसनगरमधील शांतीनगरचा यात समावेश आहे. यामुळे सुभेदार गल्ली आणि शांतीनगर या दोन्ही परिसरात शहर पोलिसांनी ड्रोन कॅमेर्‍याने नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या