संगमनेर (वार्ताहर) – भारतीय महिला शिक्षणाच्या उदगात्या सावित्रीबाई फुले यांच्या 3 जानेवारी या जयंती दिनापासून महाराष्ट्रात ‘लेक शिकवा लेक वाचवा’ अभियान राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात 3 ते 26 जानेवारी या कालावधीत अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
मुलींच्या शिक्षणाला प्रतिष्ठा आणि गुणात्मक दर्जाचे अधिष्ठान लाभावे. परिस्थितीमुळे मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. मुलींना शिक्षणाची प्रेरणा देणे. त्यांचा आत्मविश्वास व वैचारिक क्षमता विकसित करणे. शारीरिक क्षमता वाढीस लावणं. सर्जनशीलतेला संधी उपलब्ध करून देणे. गळती कमी करणे याकरिता या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी शासनाने कृती कार्यक्रमही उपलब्ध करून दिला आहे.
3 जानेवारीला प्रभातफेरी काढून वातावरण निर्मिती करणे. घोषणा व पथनाट्य सादर करणे, सावित्री फुले यांच्या प्रतिमेचे पूजन, जीवनचरित्राचा परिचय, बाल दिनाची प्रतिज्ञा एखादी नाटीका सादर करणे, लघुपट दाखविण्यात यावा.शालाबाह्य मुले मुली यांची यादी जाहीर करणे असा कार्यक्रम करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत बालक पालक मेळावा, एक किंवा दोन कन्या असलेल्या मातापित्यांचा सन्मान, कर्तबगार महिलांच्या मुलाखती, चित्रकला, रांगोळी, भितीपत्रके, वक्तृत्व, निबंध स्पर्धांचे आयोजन करणे. शालाबाह्य मुला-मुलींच्या पालक भेटी. स्थलांतरित, वीटभट्टी, ऊसतोड, दगडखाणी ठिकाणी पालकांच्या भेटी.
शासकीय योजनांची माहिती, व्यवसाय मार्गदर्शन, महिला कार्यकर्त्यांचा सन्मान. संतुलित व सकस आहारावरती मार्गदर्शन, मुलांच्या बौद्धिक स्तरानुसार महिलांचे सक्षमीकरण यासाठी प्रश्नमंजुषा आदी व्यक्तींच्या मुलाखती घेणे, शालेय मुलांना शाळेत दाखल करणे, मित्र गटस्थापना करून गृहभेटी व पालक भेटी आयोजित करणे, सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित व्यक्तींच्या सहभागाने समुपदेशन करणे, स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी करणे, शिक्षणाचे महत्त्व विशद करणारे गीतमंच, कथाकथन, घोषवाक्य स्पर्धा आयोजित करणे, मी असा घडलो यासंबंधी मुलाखत, चर्चा किंवा पुस्तकातील उतार्याचे वाचन करणे, शासकीय अधिकारी, पदाधिकारी यांचे एक दिवस शाळेसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करणे.
परिसरातील व्यावसायिकांच्या मुलाखती, प्रतिकुलतेवर मात करून उच्च शिक्षण देणार्या माताना पुरस्कार देऊन गौरवणे, गुड टच, बॅड टच ओळख करून देणे. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित नाटीका सादरीकरण, गृहभेटी, शोषणाची जाणीव व उपाय, मैदानी स्पर्धेचे आयोजन, मुलींच्या सद्यस्थितीवर तक्रारपेटी, विशेष दिवस साजरा करणे, समस्यांचे निराकरण करणे, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन, कर्तृत्वान महिलांची वेशभूषा, माजी विद्यार्थ्यांना बोलावून सन्मान करणे, पथनाट्य, एकांकिका, महिलांच्या जीवन आधारित पोवाडा, ओव्या, गाणे आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
अशी असेल प्रतिज्ञा
3 जानेवारी रोजी शपथ घेतली जाणार आहे. ‘मी एक स्वतंत्र बालिका आहे. माझे भवितव्य मी घडविणार आहे. यासाठी येणार्या संकटांना, अडीअडचणींना धैर्याने तोंड देऊन माझे शिक्षण पूर्ण करण्याची माझी तयारी आहे. माझे शिक्षण मी अर्धवट सोडणार नाही, शिवाय माझ्या इतर भगिनींना देखील शिक्षणासाठी प्रोत्साहन देईन. घटनेने व्यक्ती म्हणून दिलेल्या हक्काचा मी पूर्ण वापर करीन. सावित्रीबाई फुले यांनी निर्माण केलेल्या परंपरेचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करील. देशाच्या प्रगतीच्या मार्गावर नेणारी सुजाण नागरिक बनेल’ अशा स्वरूपाची प्रतिज्ञा शाळाशाळांमधून घेतली जाणार आहे.