Monday, November 18, 2024
Homeनगरदगडखाण मालकास दंडाची नोटीस बजावण्यात दिरंगाई

दगडखाण मालकास दंडाची नोटीस बजावण्यात दिरंगाई

तक्रारदार काकासाहेब गायके यांचा आरोप

नेवासा (तालुका प्रतिनिधी)- तालुक्यातील नजीक चिंचोली येथील गट नंबर 69/2 मध्ये दगड खाणीचे अनधिकृत उत्खनन करणार्‍या व्यक्तीला 8 कोटी रुपये दंडाची नोटीस बजावण्यात तहसील कार्यालय व संबंधित तलाठी दिरंगाई करीत असल्याचा आरोप तक्रादार काकासाहेब गायके यांनी केला आहे.

- Advertisement -

नजीक चिंचोली येथील अनधिकृत खाण उत्खननाबाबत काकासाहेब गायके यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे माहिती अधिकार व तक्रार केल्याने नेवासा तहसीलदार यांनी मंडलाधिकारी यांच्यामार्फत चौकशी व पंचनामा केला.त्यामध्ये गट नंबर 69/2 मध्ये सुमारे 7800 ब्रास दगडाचे अनधिकृत उत्खनन झाल्याचे आढळून आले होते.त्यानुसार तहसीलदार यांनी दि. 26 डिसेंबर रोजी गट नंबर 69/2 चे जमीन मालक गिरीश गंगाधर आरसुळे रा. नजीक चिंचोली ता. नेवासा यांना खुलासा सादर न केल्यास व सादर केलेला खुलासा संयुक्तिक न वाटल्यास आपले विरुद्ध महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48(7) अन्वये 8 कोटी 11 लाख 20 हजार 125 रुपये दंड वसुलीची कारवाई करण्यात येईल अशी नोटीस काढली होती.

संबंधित व्यक्तीला नोटीस बजावण्याची जबाबदारी तलाठ्यांवर सोपविण्यात आली होती. परंतु नोटीस काढून 7 दिवसांचा कालावधी उलटून गेला तरीही अजून नोटीस बजावण्यात आलेली नाही, नोटीस बजावण्यात जाणीवपूर्वक दिरंगाई करून संबंधितांना वेळ देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप गायके यांनी केला आहे. गायके यांनी दि.30 डिसेंबर रोजी नेवासा तहसीलदार यांचेकडे लेखी अर्ज करून मौजे दिघी ता. नेवासा येथिल गट नं. 91/3 मधील खडी क्रेशर, नजिक चिंचोली येथील गट नं. 69/2 बोगस उत्खननाबाबत संबंधित व्यक्ती व कंपनी यांना बजावलेली दंडाची नोटीस, त्यांचा खुलासा यांची पोहोच पावती मिळणे संदर्भात मागणी केली होती.

त्यावर तहसील कार्यालयाने दि. 31 डिसेंबर रोजी गायके यांना दिलेल्या लेखी खुलाशात म्हटले आहे की, मौजे दिघी ता. नेवासा येथील गट नं. 91/3 मधील खडी क्रेशर व नजिक चिंचोली येथील गट नं. 69/2 बोगस उत्खनन दंडाची नोटीस, खुलासा व पोहोच पावती मिळणे व तसेच गट नं. 91/3 मधील स्टोन क्रेशर व तेथील मटेरिअल सिलबंद केलेले आहे.

त्याच्या सत्यप्रती व गुन्हा दाखल केला असल्यास त्याच्या सत्यप्रती मिळणेसाठी आपला अर्ज प्राप्त झालेला आहे. प्रस्तुत अर्जांचे अवलोकन केले असता या कार्यालयाकडून मौजे दिघी ता. नेवासा येथील गट नं. 91/3 मधील स्टोन क्रेशरसाठी वापरण्यात आलेल्या दगड-खडी बाबत नोटीस एम. एस. देशमुख अँड कंपनी करमाळा चौक सुरळी रोड, टेंभुर्णी ता. माढा जि. सोलापूर यांना या कार्यालयाकडील क्र.कावि/गौख/1166/2019 दि. 21 डिसेंबर 2019 रोजीची नोटीस दिघी येथील तलाठी यांनी बजावणी करून अहवाल सादर केलेला आहे.

तसेच नजिक चिंचोली ता. नेवासा येथिल गट नं. 69/2 मधिल अनधिकृत उत्खनन बाबत या कार्यालयाकडील नोटीस क्र. कावि/गौख/1199/2019 नेवासा दि. 26 डिसेंबर 2019 रोजीची नोटीस. गिरीश गंगाधर आरसुळे रा. नजिक चिंचोली यांना नोटीस गेवराई तलाठी यांचे मार्फत बजावणीसाठी पाठविण्यात आलेली आहे. परंतु तलाठी यांना संपर्क केला असता सदर व्यक्ती स्थानिक रहिवासी नसल्याने काल दि. 31 डिसेंबर अखेर नोटीस बजावता आली नाही असा खुलासा देण्यात आला.

दरम्यान संबंधित तलाठी यांचेशी संपर्क केला असता नजीक चिंचोली येथील गट नंबर 69/2 मधील अनधिकृत उत्खननाबाबत नोटीस काढण्यात आलेले गिरिश गंगाधर आरसुळे हे नजिक चिंचोली येथील स्थानिक रहिवासी नसून त्यांचा पूर्ण पत्ता उपलब्ध नसल्याने नोटीस बजावण्यात अडचण येत आहे.त्यांचा रहिवाशी पत्ता उपलब्ध करून लवकरात लवकर नोटीस बजावण्यात येईल असे सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या