श्रीगोंद्यातील चारही कारखाने बंद; उसासाठी शेतकर्यांची अडचण
श्रीगोंदा (प्रतिनिधी) – तालुक्यातील दोन सहकारी आणि दोन खाजगी कारखाने ऊस नसल्याने सुरूच झाले नाहीत. यामुळे कुकडी आणि घोडच्या लाभ क्षेत्रात असणारा ऊस तोडण्यासाठी शेजारच्या तालुक्यातील कारखान्यांकडे हेलपाटे मारावे लागत असल्याने अनेक शेतकर्यांची अडचण झाली आहे. उसतोड मिळत नसल्याने वडाळी मधील शेतकरी अशोक देवखिळे हे उपोषणाला घरातच बसले होते. पोलीस निरीक्षक आणि अंबालिका कारखाना शेतकी अधिकारी यांच्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेतले. मात्र अनेक शेतकर्यांना आपले ऊस तोडणीसाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
वडाळी ता. श्रीगोंदा येथील अशोक दादा देवखिळे रा. वडाळी हे त्यांच्या गट नं.283 मधील 1 एकर ऊस कोणताही कारखाना तोडून घेऊन जात नसल्याने त्यांच्या राहत्या घरी वडाळी येथे उपोषणाला बसलेले होते. जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या पत्रानुसार प्रादेशिक सहसंचालक(साखर)अहमदनगर यांनी जनरल मॅनेजर अंबालिका शुगर प्रा.लि. यांना ऊस तोडणी करण्याबाबत पत्र दिलेले आहे.
त्यानुसार अंबालिका साखर कारखाना चे शेतकी अधिकारी भोसले यांनी उद्या दिनांक 31/1/2020 रोजी पासून ऊस तोडुन नेणार आहेत. त्यामुळे उपोषणकर्ते यांचे समाधान होऊन त्यांनी शांततेत उपोषण सोडले आहे. तालुक्यातील नागवडे सहकारी कारखाना, कुकडी कारखाना हे सहकारी कारखाना तर पाचपुतेंचे देवदैठण आणि हिरडगावचे साईकृपा कारखान्याचे गाळप सुरूच झाले नाही.
2018 आणि 2019 चा दुष्काळा यामुळे ऊस कमी असला तरी घोड, भीमा नदीच्यासह घोड आणि कुकडी कालव्यांच्या लाभ क्षेत्रात असलेल्या उसाने आता तुरे टाकले आहेत. तालुक्यातील कारखाने बंद असल्याने शेजारच्या अंबालिका, दौंड शुगरकडे ऊस घालण्यासाठी टोळी मिळण्यासाठी वाट पहावी लागत आहे. त्यात टोळी मिळाली तर टोळीच मुकादमापासून तोडणी कामगार यांची सेवा करावी लागत आहे.
अशोक काराखन्याच्या टोळ्यांमुळे दिलासा : बुधवंत
आता थेट श्रीरामपूरच्या अशोक कारखान्याने देखील टाकळी लोणार परिसरात चार ते पाच टोळ्या दिल्याने शेतकर्यांना दिलासा मिळणार असल्याचे सेवा संस्थेचे अध्यक्ष काका बुधवंत यांनी सांगितले.