Tuesday, May 7, 2024
Homeनगरसुकेवाडीत बिबट्याचा बालकावर हल्ला

सुकेवाडीत बिबट्याचा बालकावर हल्ला

संगमनेर (प्रतिनिधी)- शेतात आईच्या पाठीमागे पायी चाललेल्या 6 वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना तालुक्यातील सुकेवाडी महादेव वस्ती येथे रविवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली.

सुनील नामदेव चव्हाण (वय 6) असे जखमी बालकाचे नाव आहे. सुकेवाडी येथील महादेव वस्तीवर बबन मुरलीधर सातपुते यांच्या स. नं. 180 मधील पंडित क्षेत्रात रात्री 8 ते 9 वाजेच्या सुमारास सुरेखा नामदेव चव्हाण या घराच्या बाजूस शौचालयावरून घराकडे जात असताना आईच्या मागे सुनील चालला होता. पायात भरलेला काटा काढण्यासाठी खाली वाकला असता शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक सुनील याच्यावर हल्ला केला. बिबट्याने सुनीलच्या मानेला धरल्यावर त्याने जोरात आईला हाक मारली.

- Advertisement -

ही हाक ऐकल्याने आईने मागे वळून पाहिले तर बिबट्याने मुलाला पकडलेले. तिने आरडाओरड केल्याने बिबट्याने बालकाला टाकून धूम ठोकली. बिबट्याने सुनीलच्या मानेला, हाताला, पायाला खोलवर चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने संगमनेरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सुकेवाडी महादेव वस्ती परिसरात नेहमीच बिबट्यांचा वावर आहे. अनेकवेळा वनखात्याकड़ून पिंजरे लावण्यात आले. परंतु प्रत्येक वेळी बिबट्याने हुलकावणी दिली आहे. वनखात्याला अद्याप या परिसरातील बिबट्यांना पकडण्यात यश आले नाही. सुकेवाडीचे सरपंच वैभव सातपुते यांनी घडलेल्या घटनेची माहिती वनक्षेत्रपाल एस. एस. वनक्षेत्ररक्षक, एस. एम. पारधी यांनी जागेवर पंचनामा केला. येथील नागरिकांच्या मागणी वरून ताबडतोब पिंजरा लावण्यात आला.

महादेव वस्ती परिसरात राहणार्‍या कुटुंबांची हलाखीची परिस्थिती आहे. जमिनीचे व्यवहार हे नोटरीवर झाल्याने राहत्या घराच्या नोंदी ग्रामपंचायत करत नाही. त्यामुळे या कुुटुंबांना उघड्यावर शौचास जावे लागते. मका, ऊस, घास व परिसरात वेड्या बाभळींचे साम्राज्य यामुळे बिबटे या परिसरात दबा धरून बसतात आणि अशा गंभीर घटनांना अनेक कुटुंबांना सामोरे जावे लागते.
 

- Advertisment -

ताज्या बातम्या