काही वर्षांपूर्वीची मी आणि आताची मी, काय चांगले बदल झाले माझ्यात? अगदी सहज विचार मनात आला. आपण अनुभवातून शिकणारी, समजणारी माणसे. प्रत्येक प्रसंग, अनुभव हा आपल्याला खूप काही देऊन जातो आणि हे फक्त आपल्या हातात आहे की त्या अनुभवाचे सोने करायचे की माती.
आपला केलेला अपमान, मिळालेले नकार, झालेली फसवणूक हे असे इंधन असते ज्यामुळे आपल्यातल्या निद्रिस्त ठिणगीला जागृत करायचे असते. एकदा ती पेटून उठली की आपल्यातले सगळ्यात बेस्ट आपण द्यायचे आणि त्यातून काहीतरी नावीन्यपूर्ण क्रिएशन घडवायचे असते. स्वतःलाच स्वतः चे काहीतरी नवीन उमगलेले असते. आपल्या प्रगतीच्या मार्गात आपल्याला नावे ठेवणारी लोकंही आपले मार्गदर्शक असतात म्हणून त्यांचे आभार मानायचे आणि पुढे चालायचे.
मागच्या काही वर्षांत हेच प्रामुख्याने शिकले. कृतज्ञता व्यक्त करणे. आयुष्याकडे कृतज्ञतेने बघता येऊ लागले. आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या प्रॉब्लेम्सकडे बघितले की आपण खूप सुखी आहोत, याची जाणीव होते. आपल्याला मिळालेले धडधाकट शरीर, विचार करणारे मन, बुद्धी, चिकाटी, सहनशक्ती या जोरावर आपणही यशस्वी होऊ शकतो. माझी सद्गुरुंवरची श्रद्धा अजून दृढ होऊ लागली. कारण जे माझ्याकरिता सर्वोत्तम आहे तेच मला ते देताहेत याची पूर्ण खात्री मला होऊ लागली.
ज्यांना खरेच आपले मानले होते अशा आपल्याशी वाईट वागलेल्या लोकांना माफ करायला शिकले. समोरचा माणूस असा वागला म्हणून मीही तसेच वागले पाहिजे ही विचारधारा बदलावीशी वाटली. कारण यात फक्त वेळ जातो आणि मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणून त्यांची माफीही मागितली आणि त्यांना माफही केले. आधी खूप राग यायचा, खूप ओव्हर रिअॅक्ट व्हायचे. आता राग येत नाही असे नाही पण तो काही क्षणात विसरून जाते. काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात आणि ते आता जमायला लागले. यात रेकी साधनेचे मी खूप आभार मानीन. शांत राहून, संयम बाळगून सकारात्मक राहायला मला रेकीची खूप मदत होते.
मुख्य म्हणजे वेळेचे महत्त्व समजायला लागले. जे वाटतेय ते लगेच करून मोकळे व्हा मग ते नाटक, सिनेमा बघणे असो, पुस्तक वाचन असो, प्रवास असो. हा क्षण महत्त्वाचा. अगदी आपल्या माणसांजवळ व्यक्त व्हायचे असेल, संवाद साधायचा असेल तर ते सांगून मोकळे व्हा. जवळच्या माणसांबद्दल वाटणारा जिव्हाळा व्यक्त करणे किती महत्त्वाचे आहे हे आता उमगलेय. मग ते आपले मित्र- मैत्रिणी असो किंवा आपली आवडती व्यक्ती. त्यांना समजून घेता येऊ लागले. प्रत्येक गोष्ट माझ्याच मानाप्रमाणे होईल हा आग्रह सोडून द्यायला शिकले.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अपेक्षांचे ओझे कमी करून, तक्रारींना जागा न देता आनंदी राहायला शिकले. एकदा का आपण आनंदी राहायला शिकलो की येणारे विचारही खूप सकारात्मक असतात. जाणीवपूर्वक नकारात्मक विचारांना बाजूला ठेऊन अखंड सकारात्मकतेची ऊर्जा मनात जागृत ठेवायची. कारण जे माझ्याजवळ आहे तेच मी सर्वांना देऊ शकते. हाच आनंद, हेच प्रेम सगळ्यांना देऊन ते द्विगुणित करू शकते.
-वैशाली गुडी