Sunday, May 26, 2024
Homeनगरमाणसांच्यापाठोपाठ जनावरे देखील विषाणूजन्य आजाराच्या विळख्यात

माणसांच्यापाठोपाठ जनावरे देखील विषाणूजन्य आजाराच्या विळख्यात

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात आधीच कोविड, स्वाईन फ्लूची अन्य विषाणूजन्य आजारामुळे माणसं त्रस्त असतांना आता जनावरांना देखील विषाणूजन्य आजाराच्या विळख्यात सापडली आहेत. अकोले तालुक्यात 15 जनावरांना विषाणूजन्य लम्पी स्कीन डिसीज (आजाराची) लागण झाली असून श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरमध्ये या आजाराचे संशय जनावरे आढळली असून त्यांचे रक्ताची नमुने भोपाळच्या राष्ट्रीय प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी शुक्रवारी बेलापूर येथे जावून लम्पी स्कीन डिसीजच्या संशयीत जनावरांची पाहणी करत पशूसंवर्धन अधिकारी आणि जनावरांच्या डॉक्टरांना सुचना केल्या आहेत. यावेळी जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे, जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी एस. के. कुमकर उपस्थित होते. लम्पी स्कीन डिसीज हा जनावरांच्या त्वचेला होणार आजार आहे. महाराष्ट्रात लम्पी स्कीन डिसीज या आजाराचा प्रसार गडचिरोली जिल्ह्यात (सिरोंचा) मार्च 2020 झाला होता. तर नगर जिल्ह्यामध्ये 2021-22 मध्ये अकोले तालुक्यामध्ये रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला होता. लम्पी स्कीन डिसीज हा विषाणूजन्य चर्मरोग साथीचा आजार आहे. हा रोग मुख्यत्वे गायी व म्हशीमध्ये आढळून येतो. विदेशी वंशाच्या आणि संकरित गायीमध्ये देशी वंशाच्या गायीपेक्षा रोग बाधेचे प्रमाण अधिक असते. उष्ण व दमट हवामान रोग प्रसार होण्यास अधिक पोषक असते. या आजारामुळे होणार्‍या मरतुकीचे प्रमाण कमी असले तरी रोगी जनावरे अशक्त होत जातात, त्यांचे दुग्ध उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटते तसेच काही वेळा गर्भपात होतो व प्रजनन क्षमता घटते. पर्यायाने पशुपालकांचे आर्थिक नुकसान होते.

- Advertisement -

आजाराचा प्रसार मुख्यत्वे चावणार्‍या माश्या, डास, गोचिड, चिलटे यांच्या मार्फत होतो. हा आजार झालेल्या जनावरांमध्ये डोळ्यातून व नाकातून पाणी येणे, लसिकाग्रंथीना सूज येणे, भरपूर ताप येणे, दुग्ध उत्पादन कमी होणे, चारा खाणे, पाणी पिणे कमी होते, त्वचेवर गाठी येतात, अशी लक्षणे आढळून येतात. नगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यामध्ये नुकताच या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यामुळे रोग प्रसारास प्रतिबंध करण्याच्यादृष्टीने रोग प्रादुर्भावदरम्यान विशेष सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. त्यासाठी कीटकनाशक औषधांचा जनावराच्या अंगावर व गोठयात फवारा मारावा. सध्या भारतात या रोगावरची लस उपलब्ध नाही. मात्र शेळ्यामध्ये देवी या रोगावर वापरण्यात येणारी लस वापरून हा रोग नियंत्रणात आणता येवू शकतो. प्रादुभीवग्रस्त भागात जनावरांची ने आण वाहतूक बंदी व जनावरांच्या संपर्कातील माणसांच्या हालचालीवर बंधन आणण्याची आवश्यकता असते. तसेच जनावरांचे बाजार बंद ठेवणे आवश्यक असते. रोगाचा प्रसार बाह्य किटकाव्दारे होत असल्याने व रोग प्रसार रोखण्यासाठी पशुपालकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे.

…………….

नगरला नियंत्रण कक्ष कार्यान्वित

जिल्ह्यामध्ये लम्पी स्कीन डिसीज या रोगाचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यातील पशुपालक, सामान्य नागरीक तसेच क्षेत्रीय स्तगावर कार्यरत पशुसंवर्धन विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना मार्गदर्शन करणे व त्यांच्या शंकाचे निरसनकरणे यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कर्यालय येथे स्थापन करण्यात आला आहे. तसेच तालुकास्तरावर पशूधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, सर्व तालुके यांची संपर्की अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. जनावरांमध्ये या आजारांची लक्ष दिसून आल्यास त्याठिकाणी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

………………

गर्दनीच्या पाच किलोमध्ये लसीकरण

अकोले तालुक्यात गर्दनी गावातील 15 जनावरांना लम्पी स्कीन डिसीजचा प्रार्दुभाव झाल्याचे समजात पशूसंवर्धन विभागाने याठिकाणी उपाययोजना सुरू केल्या आहेत. या सर्वांची स्थिती आता नियंत्रणात असून या गावाच्या पाच किलो मीटरच्या परिघात जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. या परिसरात 2 हजार 190 जनावरे असून त्यापैकी शुक्रवारपर्यंत 1 हजार 700 जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती पशूसंवर्धन विभागाने दिली आहे.

……………..

- Advertisment -

ताज्या बातम्या