राहाता (तालुका प्रतिनिधी)- साकुरी येथील इंद्रनगर परिसरातील तरटे मंडप यांच्या दुमजली इमारतीच्या वरच्या मजल्याला अचानक काल सकाळी आग लागली. या आगीत मंडपाचे ठेवलेले साहित्य जळून खाक झाले. यात त्यांचे सुमारे पाच लाखांचे साहित्य जळून खाक झाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
साकुरी येथे बडोदा बँकेच्यामागे प्रसिध्द तरटे मंडप डेकोरेटर यांच्या इमारतीतील दुसर्या मजल्यावरील मंडप साहित्याच्या खोलीतून सकाळी नऊ वाजेच्या सुमारास धूर येताना दिसला. परिसरातील नागरिकांनी तातडीने तेथे धाव घेतली व आग विझविण्याचा प्रयत्न केला. तसेच राहाता नगरपालिकेच्या अग्नीशामन विभागाला कळविले. मात्र गाडी नादुरूस्त असल्याचे सांगितले. त्यानंतर शिर्डी नगरपंचायतीची गाडी आली. तोपर्यंत गोडाऊनमधील मंडप डेकोरेशन साहित्य, साऊंड सिस्टीम, कपड्याने पेट घेतला.
यामध्ये त्यांचे पाच लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. प्रचंड धुरामुळे आग विझविण्यास अडथळा येत होता. तरटे मंडपचे किरण तरटे या इमारतीच्या खालच्या भागात राहत होते. दुसर्या मजल्यावर काही भागामध्ये मंडपचे साहित्य ठेवले होते. उर्वरित दोन खोल्यांमध्ये त्यांचे वास्तव्य होते. या खोलीत काल सकाळपर्यंत त्यांचे नातू झोपलेले होते. परंतु आग लागण्याच्या 10-15 मिनिटे अगोदर नातू उठल्यामुळे त्याला घेऊन खाली आले. त्यानंतर त्या ठिकाणी आग लागली.
आग विझविण्यासाठी अगोदर राहाता नगरपालिकेत कर्मचारी व अधिकार्यांना अग्निशमन पाठविण्याबाबत विनंती केली. मात्र या अधिकार्यांनी व कर्मचार्यांनी अग्निशमन गाडी बिघडली असून आम्ही पाठवू शकत नाही, असे सांगितले व अन्य मदत करण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे कर्मचार्यांच्या अशा वागणुकीमुळे या परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला.
शिर्डी पंचायतीच्या गाडीने अर्धा तास परिश्रम घेत आग आटोक्यात आणली. वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ व नुकसान टळले. या परिसरा लगतच मोठी वसाहत असून या परिसरातील तरुणांनी आग विझविण्यासाठी मोठे प्रयत्न केले. वेळेत राहाता पालिकेची अग्नीशामन गाडी उपलब्ध झाली असती तर नुकसान टळले असते, असे किरण तरटे यांनी सांगितले. शॉट सर्कीटमुळे आग लागल्याचा प्राथमीक अंदाज व्यक्त केला जात आहे.
वाहने बनली शोभेची बाहुले
सरकारचे लाखो रुपये खर्च करून अग्नीशामक व उपसक खरेदी केलेले आहेत मात्र प्रशिक्षित चालक नसल्याने ही नवी वाहने नेहमी नादुरूस्त असतात. त्यामुळे ही वाहने केवळ शोभेची वस्तू आहेत का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.