Saturday, January 17, 2026
HomeUncategorizedLatur Mahapalika Election Result: लातूरमध्ये काँग्रेस-वंचितची मुसंडी, चव्हाणांच्या 'त्या' विधानानं निवडणूक फिरली

Latur Mahapalika Election Result: लातूरमध्ये काँग्रेस-वंचितची मुसंडी, चव्हाणांच्या ‘त्या’ विधानानं निवडणूक फिरली

लातूर । Latur

निवडणूक प्रचारादरम्यान केलेली वादग्रस्त विधाने राजकीय पक्षांना किती महागात पडू शकतात, याचा जिवंत प्रत्यय लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालातून समोर आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या एका विधानाचा फटका भाजपला बसला असून, लातूरमधील सत्ता सत्ताधारी पक्षाच्या हातातून निसटली आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने जोरदार मुसंडी मारत स्पष्ट बहुमत मिळवले आहे.

- Advertisement -

लातूर महानगरपालिकेच्या एकूण ७० जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत बहुमतासाठी ३६ हा जादूई आकडा गाठणे आवश्यक होते. मतमोजणीअंती काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीने तब्बल ४७ जागा जिंकत महापालिकेवर आपला झेंडा फडकावला आहे. दुसरीकडे, गेल्या निवडणुकीत ३६ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवणाऱ्या भाजपला यंदा केवळ २२ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. इतर पक्षांच्या कामगिरीवर नजर टाकल्यास, अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ १ जागा मिळाली आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत आपले खातेही उघडता आले नाही.

YouTube video player

लातूरमध्ये भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते विलासराव देशमुख यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. “विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील,” असे विधान चव्हाण यांनी एका जाहीर सभेत केले होते. लातूरची जनता आजही विलासराव देशमुखांना आपले दैवत मानते, अशा परिस्थितीत हे विधान आगीत तेल ओतणारे ठरले. या विधानाचे तीव्र पडसाद केवळ लातूरमध्येच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात उमटले.

चव्हाण यांच्या विधानावर विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि अभिनेते रितेश देशमुख यांनी अत्यंत संयमी पण सडेतोड प्रतिक्रिया दिली होती. “लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावे लोकांच्या मनावर कोरलेली असतात, ती कधीही पुसली जात नाहीत,” अशा शब्दांत रितेश यांनी भाजपला सुनावले होते. या भावनिक आवाहनाचा लातूरच्या जनतेवर मोठा प्रभाव पडला आणि भाजप विरोधात नाराजीचा सूर उमटला.

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लातूरमध्ये धाव घेत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. “विलासराव देशमुखांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान आहे आणि हे मान्य करण्यात आम्हाला कोणताही संकोच नाही,” असे म्हणत फडणवीस यांनी चव्हाण यांच्या विधानावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, मतदारांनी भाजपच्या या सारवासारवीला धुडकावून लावत काँग्रेसच्या बाजूने कौल दिला.

राज्यातील इतर महापालिकांमध्ये भाजपने चांगली कामगिरी केली असताना, केवळ एका चुकीच्या विधानामुळे लातूरचा बालेकिल्ला भाजपला गमवावा लागला आहे. स्थानिक अस्मिता आणि लाडक्या नेत्याबद्दलचे अनुद्गार मतदारांना रुचले नसल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.

ताज्या बातम्या

Nashik MC Election : महाजन ठरले ‘सुपर हिरो’, मालेगावात भुसेच ‘दादा’

0
नाशिक । शैलेंद्र तनपुरे- दै. देशदूत संपादक | Nashik आयाराम, गुन्हेगारांना पक्षात प्रवेश दिल्यावरून पक्षासह नाशिककरांच्या (Nashik) टीकेचे धनी झालेल्या मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan)...