मुंबई । Mumbai
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवरून वातावरण चांगलेच तापले आहे. या दोन समाजाच्या प्रमुख आंदोलक नेत्यांमध्ये, म्हणजे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यामध्ये पुन्हा एकदा वैयक्तिक आणि अत्यंत टोकाचा शाब्दिक हल्लाबोल झाल्याचे दिसून आले आहे. लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटलांवर थेट “मनोरुग्ण”, “हरामखोर” आणि “मूर्ख” माणूस अशी टीका केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच लक्ष्मण हाके यांच्या संदर्भात बोलताना अश्लील हातवारे केल्याचा आरोप आहे. याच कृतीवर बोलताना लक्ष्मण हाके यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. हाके यांनी जरांगे यांच्या वर्तणुकीवर टीका करताना म्हटले, “त्यातून त्यांची संस्कृती दिसून आली आहे. जरांगे यांना पाचवीत नेऊन टाका, म्हणजे त्यांना नागरिकशास्त्र कळेल आणि बाकी सगळं लगेच लक्षात येईल. ही सार्वजनिक ठिकाणी बोलण्याची भाषा आहे का? विचाराचं उत्तर कधीतरी उत्तराने द्यावं.”
जरांगे यांच्या वारंवार बदलणाऱ्या वक्तव्यांवर आणि आक्रमक भूमिकेवर लक्ष वेधत हाके म्हणाले, “एक दिवस मनोज जरांगेंसमोर बूम (माईक) नसला, तर त्यांच्या जिवाचा तिळपापड होतो. माझ्याबद्दल बोलताना ते कधी मी येवल्याचा माणूस, तर कधी फडणवीस यांचा माणूस आहे, असं म्हणतात. यांच्या डोक्याची मंडई झाली आहे. मनोज जरांगे हरामखोर माणूस आहे. महाराष्ट्रातलं वातावरण जरांगे यांनी बिघडवले आहे.”
लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटलांना मिळालेल्या मराठा समाजाच्या नेतृत्वावरही दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, “मराठ्यांना मनोज जरांगेसारखा नेता मिळाला, हे मराठ्यांचे दुर्दैव आहे. मनोज जरांगेंची भाषा लोकशाहीची नाही. मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास नाही, हे फक्त आम्ही नाही; तर आयोग, सुप्रीम कोर्ट आणि अनेक आयोग वारंवार म्हणत आहेत. या प्रश्नाचे उत्तर जरांगेंकडे नाही,” असे स्पष्ट मत हाके यांनी मांडले.
मराठा समाजातील समान आडनाव असलेल्या व्यक्तींना नोंदी शोधण्यासाठी अर्ज करा आणि ५८ लाख नोंदींची यादी लावा, या जरांगेंच्या मागणीवरही लक्ष्मण हाके यांनी तीव्र आक्षेप घेतला. हाके यांनी प्रश्न उपस्थित केला, “आता मोरे हे आडनाव मराठा आहे, ओबीसी आहे, एससी आहे; मग जरांगे नेमके कोणत्या नावाला चॅलेंज करणार आहेत?” महाराष्ट्रातील जनतेने जरांगेंसारख्या व्यक्तीला निवडावे लागते, याची आपल्याला लाज वाटते, असे म्हणत त्यांनी जरांगेंच्या ज्ञानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“न्यायमूर्ती पी व्ही सावंत कुठे, बीजी कोळसे पाटील कुठे, एनडी पाटील कुठे, आणि जरांगे कुठे? हा काय दिवटा आहे? कुठून शोधला आहे याला?” हाके यांनी जरांगे यांना तात्काळ मानसोपचारतज्ज्ञाकडे नेऊन त्यांच्यावर इलाज करण्याची मागणी केली आहे. “हा माणूस महाराष्ट्राची वाट लावल्याशिवाय राहणार नाही,” असा गंभीर इशाराही त्यांनी दिला.
ओबीसी समाजाच्या एकजुटीची ताकद दाखवण्याचा इशारा देत हाके म्हणाले, “जरांगे दहा टक्क्यांच्या मतांवर उड्या मारत आहेत. जर ९० टक्क्यांनी एकत्र आल्यावर त्यांना (मराठ्यांना) १० टक्के एकत्र आणता येत असतील, तर आम्ही ९०% एकत्र आणल्यास त्यांचं काय होईल?” या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला हात जोडून विनंती केली, “जरांगे हे बावळट माणूस आहेत, मूर्ख माणूस आहेत. महाराष्ट्राने यांच्या नादाला लागू नये.” शेवटी जरांगे यांनी शाळेत जाऊन इतिहास आणि नागरिकशास्त्र शिकण्याची गरज असल्याचे सांगत हाके यांनी आपला हल्लाबोल संपवला.




