अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर एलसीबीच्या (स्थानिक गुन्हे शाखा) प्रभारी पदावर होणार्या बदलाची चर्चा अखेर संपुष्टात आली आहे. निरीक्षक दिनेश आहेर यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली असून, त्यांच्या जागी जळगाव येथून बदली होऊन आलेले निरीक्षक किरणकुमार कबाडी यांची एलसीबीच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या बदलाचे आदेश अधीक्षक घार्गे यांनी बुधवारी (23 जुलै) रात्री उशिरा काढले.
तत्कालीन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या कार्यकाळात, 4 एप्रिल 2023 रोजी निरीक्षक आहेर यांच्याकडे एलसीबीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आहेर यांनी दोन वर्षांहून अधिक काळ या पदावर कार्यरत राहत खून, दरोडे, जबरी चोरी, घरफोडी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासात उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या कार्यकाळात गाजलेल्या अनेक खूनप्रकरणांतील आरोपींना अटक करण्यात एलसीबीला यश आले. मात्र त्यांच्या कार्यकाळात काही घटनांमुळे एलसीबी वादग्रस्त ठरली.
खासदार नीलेश लंके यांनी एलसीबीच्या कारभाराविरोधात उपोषण केले होते. तसेच ‘ग्रो मोअर’ फसवणूकप्रकरणात एका संशयित आरोपीकडून ऑनलाईन पैसे घेतल्याचा आरोप एलसीबीवर झाला होता. आता निरीक्षक आहेर यांची बदली करत एलसीबीची सूत्रे निरीक्षक कबाडी यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. जिल्ह्यातील गुन्हेगारीवर वचक ठेवत, अंमलदारांमधील अंतर्गत गटबाजीवर नियंत्रण ठेवणे हे त्यांच्या समोरचे महत्त्वाचे आव्हान असणार आहे.
एसपींचा कबाडींवर विश्वास
निरीक्षक कबाडी हे यापूर्वी चाळीसगाव (जि. जळगाव) पोलीस ठाण्याचे प्रभारी होते. मात्र, त्या ठाण्यातील एका अंमलदाराच्या लाचखोरी प्रकरणात त्यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली होती. या प्रकरणावरून चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आंदोलनही छेडले होते. वादग्रस्त पार्श्वभूमी असूनही अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी कबाडी यांच्यावर विश्वास दाखवत एलसीबीचे सूत्रे त्यांच्या हाती दिली आहेत. अधीक्षक घार्गे यांचा विश्वास सार्थ ठरवण्याचे मोठे आव्हान आता निरीक्षक कबाडी यांच्यासमोर आहे.




