Wednesday, September 11, 2024
Homeमुख्य बातम्यापदभरती घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची वडेट्टीवारांची मागणी

पदभरती घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची वडेट्टीवारांची मागणी

मुंबई | प्रतिनिधी

राज्यातील तलाठी भरतीत मोठा भ्रष्टाचार झाला असून परीक्षेचे पेपर फुटले आहेत. तरीही सरकार ही नोकर भरती रेटून नेण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय मुंबई पोलीस भरती आणि वन विभागाच्या भरतीचा सुद्धा पेपर फुटला आहे. त्यामुळे या परीक्षा आणि पदभरती घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करावी. घोटाळा झाला असल्यास आणि शेवटच्या आरोपी पर्यंत पोहचणे शक्य नसल्यास पदभरती रद्द करून नवीन उपाययोजनेसह तत्काळ फेरपरीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी एक्सवरून केली.

- Advertisement -

राज्य सरकारकडून पदभरती सुरु असून त्यासाठी परीक्षा घेतली जात आहे. मात्र, अनेक ठिकाणी परीक्षेचे पेपर फुटत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पेपरफुटी प्रकरणावरून वडेट्टीवार यांनी आज सरकारवर जोरदार टीका केली.

सरकारने फेरपरिक्षेबाबत न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पाहता तरुणांच्या मागणीचा विचार करावा. तीन महत्वाच्या परीक्षांचे पेपर फुटतातच कसे? नोकर भरती प्रक्रियेत घोटाळा झाला नाही, अशी एकही परिक्षा होत नाही. ईडी, सीबीआय अशा कार्यतत्पर संस्था असूनही आरोपी सापडत नाहीत. नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या राज्यातील लाखो तरूणांच्या भवितव्याशी राज्य सरकार खेळ खेळत आहे. सरकारला परिक्षाही घेता येत नाहीत.

सातत्याने पेपरफुटी होत आहे. राज्य सरकार मात्र त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. खोके देऊन पक्ष फोडा, आता खाली खोके पुन्हा भरण्यासाठी नवीन मार्ग शोधा हेच राज्यात सुरू असलेल्या पेपर फुटी मागचे कारण असू शकते असे वाटते, अशी जळजळीत टीकाही वडेट्टीवार यांनी केली आहे.

सदर पेपर फुटीच्या रॅकेटला कोणत्या महाशक्तीचा आशीर्वाद असेल हे तरुणांना कळले पाहिजे. त्यामुळेच त्यांनी या सर्व घोटाळ्यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची आणि तत्काळ फेरपरीक्षा घेण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या मागणीला आमचा पाठिंबा असून सरकारने न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पाहता तरुणांच्या मागणीचा विचार करावा, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या