Saturday, November 23, 2024
Homeनगरविधानसभेची प्रारूप यादी आज होणार प्रसिध्द

विधानसभेची प्रारूप यादी आज होणार प्रसिध्द

निवडणूक रणधुमाळीच्या दिशेने एक-एक पाऊल पुढे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक विभागाला मतदार यादी कार्यक्रम दिला आहे. यानुसार शुक्रवारी (दि.2) जिल्ह्यातील प्रारुप यादी प्रसिद्ध करण्यात येणार होती. परंतु यादी प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. त्यानुसार आज मंगळवारी (दि.6) ही यादी प्रसिद्ध होणार असून अंतिम मतदार यादी 30 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

- Advertisement -

राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजणार असून त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची तयारी सुरू आहे. निवडणुकीसाठी आवश्यक असणार्‍या प्रक्रियेचा एक-एक टप्पा पूर्ण करण्यात येत आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करणे हा त्याचाच एक भाग आहे. विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रावर सुसुत्रता आणण्यासाठी 25 जून ते 5 ऑगस्टदरम्यान सुसुत्रीकरण कार्यक्रम राबविण्यात आला. यानुसार जिल्ह्यात नव्याने 32 मतदार केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. संगमनेर 10, नेवासा 6, शेवगाव 3, पारनेर 1, नगर शहर 11 आणि श्रीगोंदा 1 अशी 32 मतदान केंद्र नवीन अस्तित्वात येणार आहेत.

केंद्रिय निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या निवडणुका संपताच महाराष्ट्रासह हरियाणा, झारखंड, जम्मू आणि काश्मीर राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण करण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यात 1 जुलै 2024 या अर्हता तारखेनुसार मतदार याद्या केल्या जाणार आहेत. त्यानुसार आज जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघातील प्रारूप मतदारांची यादी प्रसिध्द करण्यात येणार येणार आहे. त्यानंतर या प्रारूप यादीवर 20 ऑगस्टपर्यंत हरकती घेता येणार आहेत. तसेच 20 ते 29 ऑगस्ट दरम्यान दाखल हरकतींवर निर्णय घेण्यात येऊन 30 ऑगस्ट रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

30 ऑगस्टला अंतिम मतदार यादी
विधानसभा निवडणुकीसाठी छायाचित्रासह मतदार यादीचा सुधारित द्वितीय विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. त्यानुसार आता अंतिम मतदार यादी 30 ऑगस्टला जाहीर होणार आहे. ही मतदार यादी जाहीर झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीचा मार्ग जवळपास मोकळा होणार आहे. साधारणपणे 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या