संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
जुन्नर (Junnar) तालुक्यातील तेजेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard Attack) रूपेश तान्हाजी जाधव या आठ वर्षीय मुलाचा मृत्यू (Child Death) झाला. आज पहाटे पाच वाजता ही घटना घडली. रूपेश हा प्रातःविधीसाठी गेला असताना बिबट्याने त्याच्यावर झडप घालून जवळच असलेल्या ऊसाच्या शेतात ओढत नेले. आठ दिवसांपूर्वी रूपेश हा राहुरी (Rahuri) तालुक्यातील म्हैसगाव येथून जुन्नर येथे राहायला गेला होता.
रूपेशला बिबट्या (Leopard) घेऊन गेल्याचे लक्षात येताच त्याला सोडविण्यासाठी कुटुंबातील आणि आजुबाजूच्या व्यक्तींनी आरडाओरड केली. मात्र, बिबट्याच्या तावडीतून त्याची सुटका करण्यास त्यांना अपयश आले. या घटनेची माहिती मिळताच जुन्नर वनविभागाचे (Forest Department) प्रदीप चव्हाण हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरीक, रेस्क्यूटीम आणि वनविभागाच्या पथकाने रूपेशचा शोध घेतला असता सकाळी साडेसात वाजता त्याचा मृतदेह ऊसाच्या शेतात सापडला. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.