Thursday, September 19, 2024
Homeनगरबिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या ठार

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या ठार

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

- Advertisement -

तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख या शेतकर्‍याच्या मालकीच्या गोठ्यामध्ये असलेल्या दहा ते बारा शेळ्यांवर सोमवारी (दि. 16) पहाटेच्या वेळी बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सात शेळ्या मृत्युमुखी पडल्या. काही शेळ्या जखमी झाल्या असून सात शेळ्यांचा बिबट्यांनी फडशा पाडल्यामुळे हल्ला करणारे दोन ते तीन बिबटे असण्याची शक्यता आहे.

बिबट्यांनी शेळ्यांवरती हल्ला केल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात अनेक बिबटे असण्याची शक्यता आहे. बिबट्यांचे प्रमाण पठार भागावर आणि पारनेर तालुक्याच्या उत्तर भागामध्ये मोठे आहे. याठिकाणी अनेक वेळा शेतकर्‍यांना व ग्रामस्थांना बिबटे दिसत आहेत. गारगुंडी येथील शेख यांच्या शेळ्यांच्या गोठ्यावर बिबट्याने हल्ला केल्यामुळे सात शेळ्या मृत्युमुखी पडल्या.

शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट देत वनविभागाचे अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांना तात्काळ माहिती दिली. सात शेळ्यांचा बिबट्याने फडशा पाडल्यामुळे गारगुंडी येथील शेतकर्‍यांची आर्थिक हानी झाली आहे. शेख यांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी डॉ. पठारे, उपसरपंच प्रशांत झावरे, अक्षय फापाळे यांनी केली आहे.

टाकळीढोकेश्वर परिसरात तसेच पठार भागावर आणि तालुक्याच्या उत्तर भागातील म्हसोबा झाप, वारणवाडी, या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर दिसून येत आहे. या भागात यापूर्वी वनविभागाने बिबटे पकडलेले आहेत. मात्र, त्यानंतर देखील या परिसरात बिबट्यांचा वावर असल्याने नागरिक भयभित झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या