लोणी |वार्ताहर| Loni
जिल्ह्यात बिबट्यांकडून होत असलेल्या हल्ल्यांच्या घटना रोखण्यासाठी प्रशासनाला सर्वतोपरी उपाय योजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून,वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यासाठी अधिकची यंत्रणा कार्यान्वित करण्यास सांगितले आहे. उपाय योजनासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यामातून निधी देण्याची तयारी असल्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
मंत्री विखे पाटील यांनी जिल्ह्यातील बिबट्यांच्या हल्ल्याच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी वनविभागाच्या वतीने केलेल्या उपाय योजनांची माहीती जिल्ह्याचे मुख्य वनसंरक्षक सालविठ्ठल यांच्याकडून घेतली.जिल्ह्यात 1150 बिबटे असल्याचा अंदाज आहे. मात्र यापैकी 25बिबट्यांना पकडण्यात यश आले आहे. पण त्र वनविभागाच्या हलगर्जीपणावर मंत्री विखे पाटील यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
जिल्ह्यात 350पिंजरे लावले आहेत. 4 थर्मल ड्रोन्स् 4ट्रॅग्युलायझेशन गन्स आणि 250ट्रॅप कॅमेरे जिल्ह्यात कार्यान्वित केले असले तरी बिबट्यांचा वावर चिंताजनक आहे. जिल्ह्यातील वाढत्या घटना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनास तातडीने बैठक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानूसार बैठकीत अधिकचे उपाय करण्याबाबत प्रशासनाने निर्णय केले असले तरी वनविभागाने आवश्यक असलेल्या यंत्रणा कार्यान्वित करण्यात दाखवलेल्या निष्क्रीयतेवर मंत्री विखे पाटील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यातील घटनांचे गांभीर्य लक्षात आणून दिले आहे.जिल्ह्या करीता 22रेस्क्यू वाहन,अतिरीक्त पिंजरे ट्रॅग्युलायझेशन गन तसेच कृत्रिम बुध्दीमतेचा वापर करून ड्रोनद्वारे स्थळ निरीक्षण करण्यासाठी अधिकची यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देवू मात्र वनविभागाने प्रस्ताव तरी पाठवले पाहीजेत अशी अपेक्षा मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली..
बिबट्याच्या धास्तीने ऊसतोडणीचे दैनंदिन वेळापत्रक बदलले
ऊस तोडणीच्या हंगामात बिबट्यांच्या हालचालींनी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबटे ऊस तोडणी कामगारांवर, तसेच ग्रामस्थांवर हल्ले करत असल्याने ऊस तोडीची गती मंदावली आहे. ऊसतोडणी कामगारांनी आपली व कुटुंबाची सुरक्षितता पाहून मुक्कामाचे ठिकाण बदलले आहे. मुक्कामाच्या ठिकाणी राहणार्या टोळ्यांनी यंदा राहण्याचा मुक्काम हलवला असून, अनेकजण आता गावाजवळ राहण्यास पसंती देत आहेत. कोपरगाव, संगमनेर, नेवासा, राहुरी, श्रीरामपूर, राहाता तालुक्यांतील ऊसतोड मजुरांच्या खोप्यांवर आता रात्री व दिवसा राखण केली जात आहे. बिबट्याच्या धास्तीने ऊसतोडणी मजूर सकाळी सातच्या सुमारास ऊसतोडणीस निघत आहे. अकरा ते साडेअकरापर्यंत तोडणी करत आहेत. त्यानंतर पुन्हा सायंकाळी चारच्या सुमारास जाऊन पाचच्या सुमारास परत घराकडे परतत आहे. परिणामी त्याचा ऊसतोडणीवर परिणाम झाला आहे.




