Wednesday, February 4, 2026
HomeनगरAkole : बिबट्याच्या हल्ल्यात म्हसवंडी येथील तरुण ठार

Akole : बिबट्याच्या हल्ल्यात म्हसवंडी येथील तरुण ठार

अकोले |प्रतिनिधी| Akole

मोलमजुरी करणार्‍या एका बावीस वर्षीय आदिवासी शेतमजूर युवकाचा बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard Attack) दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास बेलापूर गावातील मल्हारवाडी परिसरात घडली आहे. पप्पू बाळू दुधवडे (वय 22, रा. ब्राह्मणदरा, म्हसवंडी, ता. संगमनेर) असे या घटनेत ठार (Youth Death) झालेल्या युवकाचे नाव आहे. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वनविभागाने (Forest Department) या परिसरात तातडीने पिंजरे लावले आहेत.

- Advertisement -

शनिवारी सकाळी सात वाजता मोलमजुरी करण्यासाठी तो बेलापूर गावी गेला होता. परंतु रात्री घरी परतत असताना मोटरसायकलचे पेट्रोल संपल्याने ओळखीच्या घराजवळ त्याने गाडी थांबवली व तो आपल्या घराकडे पायी निघाला होता. यावेळी बिबट्याने त्याच्यावर प्राणघातक हल्ला (Leopard Attack) करून त्यास ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास रविंद्र दुधवडे हा तरुण बेलापूर बदगी येथे कामासाठी जात असताना मल्हारवाडी येथील भिसे वस्तीजवळ डांबरी रस्त्याच्या कडेला बिबट्याने (Leopard) खाल्लेला मृतदेह त्याला आढळून आला.

YouTube video player

तत्काळ पोलीस पाटील केशव त्रिभुवन व भगवान काळे यांना सदर घटनेची माहिती दिली. त्यांनी अकोले पोलीस ठाणे व वनविभागाला या घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आनंदा पाटील, वनरक्षक दीपक शिंदे, सुनील शिर्के, नितीन वाळे, एस. के. बढे, आर. एस. आंबरे, बहिरु बेनके, सुनील कुक्कडवाल, दीपक गवारी आदी कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. तसेच या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी विविध ठिकाणी पाच पिंजरे (Cage) लावण्यात आले आहेत. उपनिरीक्षक व्ही. टी. घोडे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला आहे.

या हल्ल्यात ठार झालेल्या युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोतूळ येथील ग्रामीण रुग्णालयात नेला. मयत तरुणावर म्हसवंडी गावात काल सायंकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या परिसरात बिबटे, तरस, कोल्हे, लांडगे अशा हिंस्र प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने सदर नरभक्षक बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावे व कुटुंबाला लवकरात लवकर आर्थिक मदत करावी, अशी मागणी बेलापूरचे सामाजिक कार्यकर्ते भगवान काळे, राहुल लांडे, भास्कर भिसे, म्हसवंडीचे सरपंच मंगेश बोडके यांनी केली आहे.

ताज्या बातम्या