राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील वेदिका श्रीकांत ढगे या चिमुरडीचा बळी घेतल्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सिमेन स्टेशन हद्दीत लावलेल्या पिंजर्यात मादी बिबट्या भक्षाच्या शोधात पिंजर्यात अडकल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे बिबट्याने 23 मे रोजी सकाळी 8 वाजताच वेदिका ढगे या चिमुरडीला गिन्नी गवतात ओढले. चिमुरडीच्या गळ्याचा घोट घेतल्याने अधिक रक्तस्त्रावाने तिचा बळी गेला. आई गावच्या माजी सरपंच मनीषा ढगे व वडील श्रीकांत ढगे यांसह कुटुंबियांच्या समोरच बिबट्याने ढगे कुटुंबियांवर काळाचा घाला घातला. चार वर्षीय वेदिकाच्या मृत्यूने केवळ वरवंडी गावातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त झाली.
मानवी वस्त्यांकडे आगेकूच करीत हल्ला करणारा बिबट्या पुन्हा मानवी हल्ला करण्याची शक्यता पाहता वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी व्यूहरचना आखली होती. ड्रोन कॅमेर्यामार्फत बिबट्याचे वास्तव्य व शिकारीचा मार्ग पाहता घटनास्थळालगतच चार ठिकाणी पिंजरे लावले होते. दोन पिंजर्यांमध्ये शेळ्या तर दोन पिंजर्यांत कोंबड्या ठेवण्यात आल्या होत्या. 26 मे रोजी सकाळीच बिबट्या भक्षाच्या शोधात निघाला असतानाच तो शेळी ठेवलेल्या पिंजर्यात अलगद अडकला. शेळीचा फडशा पाडण्यासाठी पिंजर्यात घुसताच दरवाजाखाली येताच बिबट्याने पकडले गेल्याचे लक्षात येताच जोरजोरात डरकाळी सुरू केली.
वनक्षेत्रपाल युवराज पाचारणे, वनरक्षक पवन निकम, राजेंद्र रायकर, सतीश जाधव, जी.टी.मोरे, पोपट शिंदे, विलास तमनर, महादेव शेळके आदींचे पथक परिसरात तैनातच होते. संबंधितांनी तत्काळ पकडलेल्या बिबट्याची ओळख करून घेतली. मृत वेदिकाच्या कुटुंबियांनी पकडलेेल्या बिबट्यानेच चिमुरडीचा बळी घेतल्याची माहिती दिली. संबंधित बिबट्या हा मादी असून तो अडीच वर्ष वयाचा असल्याचे वनक्षेत्रपाल पाचारणे यांनी सांगितले. पकडलेल्या बिबट्याला डिग्रस नरसाळी येथे पशुवैद्यकीय अधिकार्यांच्या तपासणीसाठी ठेवण्यात आलेले आहे.