टिळकनगर । वार्ताहर
श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर आणि आगाशे नगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. बुधवारी (२४ डिसेंबर) पहाटेच्या सुमारास हा बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
गेल्या काही दिवसांपासून नेवासा-संगमनेर रस्त्यावरील आगाशे नगर वस्तीजवळ बिबट्याचा वावर वाढला होता. पाण्याच्या तळ्याशेजारी असलेल्या दाट निलगिरीच्या झाडीत या बिबट्याने आपला मुक्काम ठोकला होता. सायंकाळच्या वेळी अनेक नागरिकांना रस्ता ओलांडताना हा बिबट्या प्रत्यक्ष दिसला होता, तर काही ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्येही तो कैद झाला होता. यामुळे परिसरात भीतीचे सावट पसरले होते आणि शेतात जाणेही धोक्याचे झाले होते.
ग्रामपंचायत आणि वनविभागाचा पाठपुरावा
नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन दत्तनगर ग्रामपंचायत प्रशासन आणि वनविभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या. याकामी बाबासाहेब दिघे, नानासाहेब शिंदे, सरपंच सारिका कुंकूलोळ, सदस्य प्रेमचंद कुंकूलोळ, किरण खंडागळे, सुरेश शिवलकर, शहाजान बागवान तसेच ग्रामविकास अधिकारी रुबाब पटेल यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर नगराध्यक्ष करण ससाणे व विलास पुंड यांच्या शेतात वनविभागाने पिंजरा लावला.
अशी झाली कारवाई
बिबट्याला आकर्षित करण्यासाठी शेतकरी संजय तुपे यांनी पिंजऱ्यात भक्ष म्हणून शेळीचे करडू ठेवले होते. बुधवारी पहाटे भक्षाच्या शोधात आलेली बिबट्याची मादी पिंजऱ्यात अडकली. ही बाब लक्षात येताच संजय तुपे यांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिली. वनरक्षक अक्षय बडे आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्राणीमित्र मंजाबापू खेमनर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेरबंद करण्यात आलेली ही अंदाजे तीन वर्षांची मादी बिबट्या आहे.
पोलीस बंदोबस्त आणि सहकार्य
बिबट्या पकडला गेल्याची बातमी पसरताच परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. या संपूर्ण मोहिमेत वनरक्षक अक्षय बडे, विलास डगळे, राहुल कानडे, बंडू खेमनर यांच्यासह माजी सरपंच सुनील शिरसाठ, उपसरपंच संजय जगताप, विशाल पठारे, संदीप मगर आणि अनेक स्थानिक ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.
वेळेवर पिंजरा लावल्यामुळे आणि वनविभागाच्या सतर्कतेमुळे संभाव्य अनर्थ टळल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. दत्तनगर आणि आगाशे नगर परिसर आता बिबट्याच्या दहशतीतून मुक्त झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.




