कसबे सुकेणे | प्रतिनिधी
कसबे सुकेणे ते कोकणगाव रोडवरील हरिभाऊ भास्कर जाधव यांच्या वस्तीवर काल पहाटे बिबट्या जेरबंद झाला. दोन दिवसांपूर्वीच परिसरात हा मादी बिबट्या नागरिकांच्या निदर्शनास पडला होता. तेव्हापासून या परिसरातील नागरिकांमध्ये दहशत होती.
परिसरातील एक-दोन पाळीव कुत्रे देखील या बिबट्याच्या भक्षस्थानी पडले होते. त्यामुळे या परिसरातील हरिभाऊ जाधव यांनी निर्भय संचार फाउंडेशन अध्यक्ष शरद जाधव व त्यांच्या पथकाबरोबर संपर्क साधत बिबट्याविषयी माहिती दिली.
वनविभाग कर्मचारी व शरद जाधव यांनी परिसराची पाहणी केली. काल सायंकाळी त्यांना एका उसाच्या क्षेत्र नजीक एका झाडावर मोठ्या प्रमाणात कावळे आढळून आले. यावरून या ठिकाणी बिबट्या असावा, असा अंदाज वन कर्मचार्यांना आला.
निर्भय संचार फाउंडेशनच्या मदतीने या परिसरात पिंजरा लावण्यात आला. सदर पिंजर्यात अलगद मादी बिबट्या पहाटे जेरबंद झाला. त्यामुळे कसबे सुकेणे गावासह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.




