कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
मागील आठवड्यात टाकळी येथे चार वर्षीय चिमुकलीचा जीव घेणार्या बिबट्याच्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच, सोमवार (दि. 10) रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास येसगाव येथील निकोले वस्तीवर शेतात गवत कापण्यासाठी गेलेल्या शांताबाई अहिलाजी निकोले (वय अंदाजे 60) या महिलेवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा करुण अंत झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच आ. आशुतोष काळे यांनी अवघ्या वीस मिनिटांत घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या संतापाची व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी घटनास्थळावरूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. माणसांच्या रक्ताची चटक लागलेल्या या नरभक्षक बिबट्याला तातडीने ठार मारण्याची परवानगी वनविभागाला द्या, अशी आक्रमक मागणी आ. काळे यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली.
वन विभागाने मागील घटनेनंतर कोणतीही ठोस कारवाई न केल्याने एका निरपराध महिलेला जीव गमवावा लागला, असा तीव्र रोष नागरिकांनी व्यक्त केला. संतप्त नागरिकांनी कोपरगाव-मनमाड मार्गावर रस्ता रोको केल्यामुळे पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. आ. आशुतोष काळे यांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री अजितद पवार यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पुणे जिल्ह्याच्या धर्तीवर उपाययोजना करण्याच्या आणि नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांना दिल्या.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी माहिती दिली की, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे आणि प्रस्ताव मंजूर होताच त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात येईल. कोपरगावसह परिसरातील इतर बिबटे-प्रवण क्षेत्रांवर पिंजरे लावण्यासाठी आ. काळे यांनी वन विभागाला निर्देश दिले आहेत.




