Sunday, January 25, 2026
HomeनगरSangamner : बिबट्यामुक्तीसाठी संगमनेरात जनआक्रोश आंदोलन

Sangamner : बिबट्यामुक्तीसाठी संगमनेरात जनआक्रोश आंदोलन

बिबट्यांच्या नसबंदीसह ठोस उपाययोजना करण्याची मागणी

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यात वाढलेल्या बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली असून सुमारे 12 नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. बिबट्यांच्या दहशतमुक्तीकरीता सोमवारी (दि.15) असंख्य नागरिकांनी रस्त्यावर येऊन सरकार विरोधात आपला आक्रोश आंदोलनातून व्यक्त केला. बिबट्यांची मोजणी करून सर्वांची नसबंदी करा, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली तर महिला, विद्यार्थी यांना भयमुक्त करण्यासाठी शासनाने बिबट्यांबाबत ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी केली.

- Advertisement -

संगमनेर बसस्थानक येथे एकत्र येवून प्रांत कार्यालयासमोर ‘संगमनेर तालुका बिबट्याच्या दहशतमुक्ततेसाठी’ जनआक्रोश आंदोलन झाले. येथे ठिय्या देत अनेकांनी आपला रोष व्यक्त केला. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, मयत सिद्धेश कडलग याचे लहानगे मित्र आंदोलनात सहभागी झाले होते. ‘बिबट्या हटाव, माणूस बचाव, बिबट्यामुक्त तालुका झालाच पाहिजे’ या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

YouTube video player

बिबट्या आता जंगल सोडून शेतामध्ये वावरत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. शेतामध्ये काम करताना शेतकरी आणि महिला घाबरत आहे, तर लहान मुलांचे अंगणामध्ये खेळणे सुद्धा बंद झाले आहे. दररोज बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडत असताना सरकार मात्र उदासीन आहे. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याबाबत आपण केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन नसबंदी करण्याची मागणी केली होती. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले पट्ट्यामध्ये बिबट्यांचे मोठे प्रमाण असून राज्य शासनाने नसबंदी करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. याचबरोबर पकडलेल्या बिबट्यांना दूर देऊन सोडले पाहिजे.

नागरिकांचे जीव जात असताना प्रशासन मात्र असंवेदनशील झाले आहे. नरभक्षक बिबट्यांना मारण्याची परवानगी द्यावी. तसेच शेतकर्‍यांना स्वसंरक्षणासाठी बंदुकीची परवानगी द्यावी, अशी मागणी ही आमदार सत्यजीत तांबे यांनी केली.
तर डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्यापासून दहशतमुक्तीकरीता सातत्याने तालुक्यात आंदोलन होत आहे. मागील एका वर्षामध्ये 12 नागरिकांनी जीव गमावले असून अनेक नागरिकांवर हल्ले झाले आहेत. आजच्या मोर्चामध्ये आम्ही राजकीय पदाधिकारी नाही तर आई म्हणून आलो आहोत.

सिद्धेश कडलग आणि इतर बिबट्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्यांच्या कुटुंबियांची काय अवस्था असेल याची कल्पना प्रशासनाला नाही. त्यामुळे प्रशासन उदासीन आहे. संगमनेर तालुका हा दुधाचा तालुका असून अनेक शेतकरी महिला शेतामध्ये काम करतात, बिबट्यांमुळे त्यांच्यामध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. हे सर्व बिबटे पकडा आणि गुजरातमधील वनतारामध्ये नेऊन सोडा आणि कायमस्वरूपी प्रभावी बंदोबस्त करा, अशी मागणी डॉ. जयश्री थोरात यांनी केली. याप्रसंगी अनेक महिला, युवक व नागरिकांनी सरकार आणि वन विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले.

मयत सिद्धेश कडलगचे वडील सूरज कडलग यांच्यासह असंख्य नागरिक जनआक्रोश आंदोलनातून रस्त्यावर आले. मात्र अधिकारी आचारसंहितेचे कारण देत निवेदन स्वीकारण्यासाठी येत नव्हते. यामुळे आमदार सत्यजीत तांबे व डॉ. जयश्री थोरात चांगल्याच आक्रमक झाल्या. त्यानंतर प्रांताधिकारी अरुण उंडे यांनी मोर्चाला सामोरे जात निवेदन स्वीकारले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, शहराचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर, पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

राज-का-रण : सिव्हिलची ‘शल्यक्रिया’ कधी होणार ?

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक सिव्हिल हॉस्पिटल हे खरंतर गोरगरिबांना चांगले उपचार मिळवून देऊन त्यांचे आशीर्वाद घेण्याचे ठिकाण. तेथे आरोग्याच्या दर्जेदार...