Wednesday, January 7, 2026
HomeनगरSangamner : बिबट्यांचा वावर रोखण्यासाठी थर्मल ड्रोनसह पाचशे ट्रॅप कॅमेरे तैनात

Sangamner : बिबट्यांचा वावर रोखण्यासाठी थर्मल ड्रोनसह पाचशे ट्रॅप कॅमेरे तैनात

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची महिती

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील बिबट्यांचा वाढता वावर व मानवी वस्त्यांवरील हल्ल्यांच्या घटना रोखण्यासाठी वन विभागाने हायटेक यंत्रणेचा वापर करावा. ज्या भागात बिबट्यांची घनता जास्त आहे, तिथे थर्मल ड्रोन, नाईट व्हिजन कॅमेरे व पाचशेहून अधिक ट्रॅप कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

- Advertisement -

संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झालेल्या चिमुकला सिद्धेश सूरज कडलग याच्या कुटुंबियांची पालकमंत्री विखे पाटील यांनी सोमवारी (दि.22) निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट घेतली. त्याप्रसंगी ते बोलत होते. आमदार अमोल खताळ, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, उपविभागीय अधिकारी अरूण उंडे, पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, तहसीलदार धीरज मांजरे आदी उपस्थित होते.

YouTube video player

पालकमंत्री विखे पाटील यांनी मृत सिद्धेशचे आजोबा, आजी, वडील सूरज कडलग व नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. ही घटना अत्यंत वेदनादायी असून शासन या दुःखद प्रसंगी पूर्णपणे कडलग कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी आश्वस्त केले. शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत व वन विभागाचे लाभ तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

बिबट्या प्रवण क्षेत्रात प्रशासनाने राबविलेल्या उपाययोजनेबाबत बोलताना ते म्हणाले, वन विभागाच्या ताफ्यात नव्याने 22 गस्ती वाहने व 5 नवीन गन (बंदुका) दाखल होत आहेत. ही मोहीम पुढील 4 ते 6 महिने प्रभावीपणे राबविण्यात येईल. बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे लावण्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर त्यांनी भर दिला. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, वन, महसूल विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

22 जानेवारीपर्यंत अतिक्रमण काढा…
बिबट्याच्या हल्ल्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत मदत पोहोचवण्यासाठी रस्ते मोकळे असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे कालव्यांच्या कडेला व वन विभागाच्या हद्दीतील रस्त्यांवर झालेली अतिक्रमणे तत्काळ हटविण्याचे कडक आदेश पालकमंत्र्यांनी दिले. हे रस्ते सार्वजनिक हिताचे असल्याने प्रसंगी पोलीस बळाचा वापर करून, येत्या 22 जानेवारीपर्यंत रस्ते मोकळे करावेत व त्यांचे मुरमीकरण करून ते वाहतुकीयोग्य करावेत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी लोकसहभागाची गरज
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांच्या संरक्षक भिंतींची उंची वाढविण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. मात्र, वाड्या-वस्त्यांवरून येणार्‍या मुलांच्या सुरक्षेसाठी गावकर्‍यांनी लोकसहभागातून पुढाकार घेण्याचे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. रोटेशन पद्धतीने ट्रॅक्टर किंवा सुरक्षित वाहनांची व्यवस्था करून मुलांना शाळेत सोडणे व आणणे ही पद्धत अवलंबिल्यास विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

ताज्या बातम्या

Rahata : शिर्डीतील तरुणाला जिवंत जाळले, कुख्यात पोकळेसह टोळी जेरबंद

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata अहिल्यानगर जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक अत्यंत भीषण आणि निर्घृण खुनाची घटना उघडकीस आली आहे. राहाता परिसरातून बेपत्ता झालेल्या सचिन गिधे या तरुणाचा...